93 वर्षीय मुगाबेंची सत्ता जाणार का? लष्कराने घेतला शासकीय दूरचित्रवाहिनीचा ताबा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 11:57 AM2017-11-15T11:57:11+5:302017-11-15T12:05:14+5:30
रॉबर्ट मुगाबे यांचा जन्म 1924 साली दक्षिण रोडेशियामध्ये झाला. 1980 ते 1987 या सात वर्षांसाठी ते झिम्बाब्वेचे पंतप्रधान होते आणि 1987 पासून ते आतापर्यंत सलग तीस वर्षे ते राष्ट्राध्यक्षपदावर आहे. त्याचप्रमाणे अफ्रिकन युनियनच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळलेली आहे.
हरारे- झिम्बाब्वेमध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये राजकीय आणि लष्करी हालचालींना वेग आला आहे. राजधानी हरारेमध्ये लष्कर तैनात झाल्यामुळे आणि शासकीय दूरचित्रवाहिनी झेडबीसीचा ताबा लष्कराने घेतल्यामुळे झिम्बाब्वेमध्ये लष्करी उठाव होणार अशी चर्चा सुरु आहे. मात्र लष्कराने आपण कोणताही उठाव करणार नसून केवळ गुन्हेगारांना लक्ष्य करत आहोत असे निवेदन प्रसारीत केले आहे.
राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे आणि त्यांचे कुटुंब सुरक्षित असून आम्ही त्यांच्या संरक्षणाची खात्री देतो असे निवेदन झेडबीसीच्या मुख्यालयातून मेजर जनरल सिबूसिसो मोयो यांनी प्रसारित केले आहे. तसेच मोयो पुढे म्हणाले, जे गुन्हे करत आहेत अशा गुन्हेगारांनाच आम्ही लक्ष्य करत आहोत. ही मोहीम लवकरात लवकर संपवू आणि परिस्थिती सामान्य पातळीला येईल अशी आमची अपेक्षा आहे.
असे असले तरी नक्की कोणाला लक्ष्य केले आहे याबाबत मोयो यांनी कोणतीच माहिती दिलेली नाही. रॉयटर्स वृत्तसंस्थेला सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अर्थमंत्री इग्नॅशियस चोंबो यांना ताब्यात घेण्यात आले आहे.या लष्करी कारवाईचे नेतृत्त्व कोणाच्या हातामध्ये आहे हे देखिल अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Zimbabwe soldiers, armoured vehicles seal road access to government offices, parliament building and courts in central Harare - Reuters witness pic.twitter.com/6AjtekPp00
— Reuters Top News (@Reuters) November 15, 2017
बुधवारी राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांच्या घराजवळील बोरोडाल या उपनगरामध्ये गोळीबार झाल्याची माहिती वृत्तसंस्थेला मिळालेली आहे. गेल्या आठवड्यात मुगाबे यांनी उपराष्ट्रपती इमर्सन मनागाग्वा यांना पदच्युत केले होते. इमर्सन हे मुगाबे यांचे राजकीय वारस मानले जात होते. मात्र नंतर राष्ट्राध्यक्ष मुगाबे यांची पत्नी ग्रेस मुगाबेचे नाव या अध्यक्षपदासाठी प्रमुख दावेदार म्हणून पुढे येऊ लागले. त्यामुळे ग्रेस मुगाबे आणि इमर्सन यांचे दोन गट सत्ताधारी झानू पीएफ पक्षात तयार झाले आणि तणावाला सुरुवात झाली.
रॉबर्ट मुगाबे यांचा जन्म 1924 साली दक्षिण रोडेशियामध्ये झाला. 1980 ते 1987 या सात वर्षांसाठी ते झिम्बाब्वेचे पंतप्रधान होते आणि 1987 पासून ते आतापर्यंत सलग तीस वर्षे ते राष्ट्राध्यक्षपदावर आहे. त्याचप्रमाणे अफ्रिकन युनियनच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळलेली आहे.