एकेकाळी करोडपती असलेला हा इसम आता झाला संन्यासी आणि राहतो बेटावर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2017 08:30 PM2017-12-07T20:30:33+5:302017-12-07T20:34:23+5:30
त्याच्याकडे सगळं काही होतं पण कालांतराने ते वैभव गेल्याने आता ते संन्यासी जीवन जगत आहेत.
सिडनी : कधीकाळी श्रीमंत व्यक्ती म्हणून नावारुपाला आलेला इसम आता अत्यंत वेगळ्या पद्धतीचं जीवन जगतोय. आर्थिक मंदी आणि बायकोने उधळलेले पैसे यामुळे त्याच्याकडे असलेली करोडोची संपत्ती लयाला गेली. त्यानंतर उदरनिर्वाहासाठी आता काय करायचं असा प्रश्न उभा राहिल्यावर त्याने आपल्या घराचा त्याग केला आणि एका बेटावर आपलं जग विस्थापित केलं. गेल्या २० वर्षांपासून त्यानं एका बेटालाच आपलं जग मानलं आहे.
सिडनीतील जिनुआमधील एका प्रसिद्ध कंपनीत अध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे डेव्हिड ग्लाशीन यांच्याकडे महागड्या गाड्या, बंगला, सुंदर बायको हे सारं काही होतं. एखाद्या व्यक्तीला आपल्याकडे जे काही असावं असं वाटत असतं, ते सारं काही या इसमाकडे होतं. पण वेळ आणि काळ काही कायम राहत नाही. त्यामुळे डेव्हिड यांचेही दिवस पालटले. १९८७ साली त्यांच्याकडे २८.४ मिलिअनची संपत्ती होती. मात्र मार्केट क्रॅश झाल्यानंतर त्यांचा व्यवहार ठप्प झाला आणि उरले-सुरले पैसेही त्यांच्या बायकोने खर्च केले. त्यामुळे त्यांच्याकडे काहीच उरलं नाही.
डेलिमेललने दिलेल्या वृत्तानुसार, सिडनीत राहणारे डेव्हिड ग्लाशीन यांचा १९ ऑक्टोबर १९८९ हा दिवस काळा ठरला. या दिवशी स्टॉक मार्केटने निचांकी गाठल्याने त्यांच्याकडे होते-नव्हते ते सारे पैसे वाया गेले. त्यामुळे त्यांच्याकडे दोनच पर्याय समोर उरले होते. याच क्षेत्रात पुन्हा मेहनत घेऊन उभं राहायचं किंवा हा समाज सोडून दुसरीकडे निघून जायचं. त्यांनी दुसरा पर्याय निवडला आणि ऑस्ट्रेलियातील रिस्टोरेशन या बेटावर स्थायिक झाले. तिकडे जाऊन त्यांनी शेती आणि मासेमारी हा व्यवसाय सुरू केला. त्यातूनच त्यांचा उदरनिर्वाह होत असतो. १९९७ साली ते तिथं स्थायिक झाले. जूनमध्ये त्यांनी त्याठिकाणी २० वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्ताने एक पार्टीही आयोजित केली होती. एवढंच नाहीतर ते इतर पर्यटकांना आपल्या इथं येऊन भेट देण्याचं आवाहन करत असतात.
गेल्या २० वर्षात त्यांनी त्यांच्या राहणीमानात अजिबात सुधारणा केलेली नाही. दाढी आणि केस वाढवलेल्या अवस्थेतच ते तिथं राहतात. त्यांना भेटण्यासाठी, त्यांच्या जीवनाचा सार ऐकण्यासाठी अनेक जण तिथं येत असतात. अनेक दिग्गजांनीही त्यांना भेटी दिल्या आहेत. जगापासून लांब राहिल्याने त्यांचं आयुष्य सूखी झालंय, असंही सांगण्यात येतंय. डेव्हिड यांच्या जगण्याचा हा प्रवास पाहता, असं दिसून येतं की, आयुष्यात कितीही खडतर प्रसंग आले तरी न खचता आपण घेतलेल्या निर्णयावर ठाम राहायचं. आयुष्यात ऐशोआराम तर पाहिजेच पण त्याचबरोबर मेहनतही पाहिजे. तेव्हाच आपल्या जगण्याचा आनंद आपल्याला मिळू शकतो.
आणखी वाचा - हा युट्यूबर महिन्याला कमावतो लाखो रुपये, वाचा काय आहे त्याचा हटके छंद