चंद्रावरही होईल कायमस्वरूपी वसाहत, थ्री डी प्रिंटेड इमारती उभ्या राहतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 01:16 AM2017-09-29T01:16:03+5:302017-09-29T01:16:23+5:30
पुढील २५ वर्षांत चंद्रावर १०० पर्यंत लोक कायमस्वरुपी राहू शकतील, असे युरोपियन स्पेस एजन्सीच्या (ईएसए) तज्ज्ञाने सांगितले. चंद्राचा पृष्ठभाग धुळीने भरलेला असून त्यावर थ्री डी प्रिंटेड इमारती उभ्या राहतील.
पुढील २५ वर्षांत चंद्रावर १०० पर्यंत लोक कायमस्वरुपी राहू शकतील, असे युरोपियन स्पेस एजन्सीच्या (ईएसए) तज्ज्ञाने सांगितले. चंद्राचा पृष्ठभाग धुळीने भरलेला असून त्यावर थ्री डी प्रिंटेड इमारती उभ्या राहतील. परंतु वितळलेल्या बर्फाचा वापर पिण्यासाठी तसेच तेथील शेतीसाठीही करणे शक्य होईल. एवढेच काय चंद्रावर मुले जन्माला येणेही शक्य आहे, असे गेल्या आठवड्यात लाटव्हियात युरोपियन प्लॅनेटरी काँग्रेसच्या पार पडलेल्या बैठकीत बर्नार्ड फोयिंग यांनी सांगितले. फोयिंग ईएसएचे ‘मून व्हिलेज’ योजनेचे राजदूत आहेत. फोयिंग म्हणाले की, २०३० मध्ये सुरुवात सहा किंवा दहा जणांपासून (त्यात शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि अभियंते असतील) होईल व ती वाढून २०४० मध्ये १०० पर्यंत जाईल. तिथे २०५० साली तुम्हाला हजारो लोक दिसतील. स्वाभाविकपणेच तुम्ही तेथे कुटुंब असावे असा विचार कराल. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचे काम २०२४ मध्ये थांबवायचे आहे. मग त्याऐवजी कायमस्वरुपी चांद्र वसाहत करावी अशीही कल्पना समोर आली आहे. तथापि, चंद्राच्या भ्रमणकक्षेत अंतराळवीर ठेवण्यापेक्षा चंद्रावर लोक आणि उपकरणे पाठवणे फारच जोखमीचे तसेच मोठ्या खर्चाचेही काम आहे. ही कल्पना यशस्वी होऊ द्यायची असल्यास ईएसए आणि नासासारख्या सरकारी संस्थांना स्पेस एक्स आणि ब्लू ओरिजिनसारख्या खासगी कंपन्यांसोबत काम करावे लागेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. परंतु चंद्रावरील वसाहतीसाठी पैसा द्यायला राजकीय नेत्यांना काही गोडी नाही, असे युनिव्हर्सिटी आॅफ लाटव्हियातील शास्त्रज्ञ व्ही. बेल्दाव्हज यांनी सांगितले. स्पेसएक्सचे संस्थापक अब्जाधीश ईलोन मस्क यांना मात्र चंद्रावर वसाहत शक्य असल्याचे वाटते. मंगळ मात्र त्यांना त्यासाठी अधिक चांगला पर्याय वाटतो.