मंडाले आणि रत्नागिरीचे शतकाहूनही जुने नाते, म्यानमार-भारत संबंधाचा दुवा

By अोंकार करंबेळकर | Published: September 5, 2017 01:12 PM2017-09-05T13:12:01+5:302017-09-05T13:12:45+5:30

19 व्या शतकाच्या शेवटी आणि 20 व्या शतकाच्या सुरुवातील झालेल्या दोन घटनांनी या शहरांमध्ये एक घट्ट नाते निर्माण झाले. आजही दोन्ही देशांच्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये या शहरांची नावे लिहिलेली आहेत.

More than hundred centuries of Mandalay and Ratnagiri, link to Myanmar-India relations | मंडाले आणि रत्नागिरीचे शतकाहूनही जुने नाते, म्यानमार-भारत संबंधाचा दुवा

मंडाले आणि रत्नागिरीचे शतकाहूनही जुने नाते, म्यानमार-भारत संबंधाचा दुवा

Next

मुंबई, दि.5- म्यानमारमधील मंडाले हे आज रंगून आणि प्रशासकीय राजधानी नाय पी डॉव यांच्यानंतरचे महत्त्वाचे शहर आहे. म्यानमारच्या राजघराण्याने या शहरालाच राजधानी बनवून पिढ्यानपिढ्या येथे राज्य चालवले होते. या शहराचा आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी शहराचा कोणत्याही प्रकारे संबंध येण्याची इतिहासात सुतराम शक्यता नव्हती. मात्र 19 व्या शतकाच्या शेवटी आणि 20 व्या शतकाच्या सुरुवातील झालेल्या दोन घटनांनी या शहरांमध्ये एक घट्ट नाते निर्माण झाले. आजही दोन्ही देशांच्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये या शहरांची नावे लिहिलेली आहेत.

म्यानमारचा अखेरचा राजा थिबा 1 ऑक्टोबर 1878 रोजी राजगादीवर बसला आणि पुढच्याच महिन्यात 6 तारखेस त्याचा राज्याभिषेक करण्यात आला. राजधानी मंडालेमधूनच तो आपला राज्यकारभार करु लागला. मात्र 1885 साली इंग्रजांनी त्याचे राज्य हस्तगत करून त्याचे पद खालसा केले. 24 तासांच्या आत अगदी लहानसहान प्रतिकाराला सहज मोडून काढत इंग्रजांनी मंडालेवर ताबा मिळवला आणि थिबाला त्याच्या कुटुंबासकट म्यानमार सोडून जाण्याचा आदेश देऊन बाहेर काढण्यात आलं. हजारो नागरिकांच्या समोर बैलगाडीमध्ये बसून थिबा आणि त्याच्या कुटुंबाला इरावदी नदीतील बोटीवर जाऊन बसावं लागलं होतं. त्यानंतर थिबाला रत्नागिरीमध्ये आणण्यात आले. रत्नागिरीत राहण्यापुर्वी 1857 च्या बंडाला मोडून काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सर जेम्स आउट्राम यांच्या खान्देशातील घरात थिबाला व त्याच्या कुटुंबाला ठेवण्यात आलं. त्यानंतर रत्नागिरीमध्ये त्याच्यासाठी राजवाडा बांधण्यात आला. जांभ्या दगडाने बांधलेला हा वाडा थिबा राजवाडा किंवा थिबा पॅलेस नावाने आजही ओळखला जाते. आपल्या गावापासून तोडून लांब भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर लहानशा गावात ठेवलं म्हणजे  ब्रह्मदेशाच्या अंतर्गत बाबींमध्ये त्याला हस्तक्षेप करता येणार नाही असा ब्रिटिशांचा यामागे हेतू होता. थिबाला पहिली पाच वर्षे 1 लाख रुपये प्रतिमहिना पेन्शन देण्यात आले. त्यानंतर ते पन्नास हजारांवर आणले गेले आणि शेवटी तर 25 हजार करण्यात आले. थिबाचा सर्वतोपरी अपमान करण्याची एकही संधी ब्रिटिशांनी सोडली नाही असं सांगितलं जातं. मंडाले आणि म्यानमारची आठवण काढतच थिबाला वयाच्या 57 व्या वर्षी 1916 साली मृत्यू आला. रत्नागिरीत त्याचं अत्यंत साधं थडगं असून त्या जांभ्याने बनलेल्या कातळावरच त्याला विश्रांती घ्यावी लागली. 

थिबाच्या मृत्यूनंतर त्याचे कुटुंबीय ब्रह्मदेशात परत गेले मात्र त्याची एक मुलगी फाया ग्यी किंवा फाया हिने गोपाळ सावंत या राजवाड्यातच काम करणाऱ्या व्यक्तीशी प्रेमविवाह केला होता. फाया मात्र भारतातच राहिली. गोपाळराव आणि फाया यांना टू टू नावाची मुलगीही झाली. एकेकाळी राजकन्या म्हणून वावरणाऱ्या फायाला आयुष्याच्या उत्तरार्धात अत्यंत हलाखीचे दिवस काढावे लागले. इतके की तिच्या निधनानंतर वर्गणी काढून अंत्यसंस्कार करावे लागले असे सांगण्यात येते. टू टूचेही आयुष्य असेच गरिबीमध्ये गेले. तिला 11 मुले असून आजही रत्नागिरीमध्ये थिबाचे हे वंशज राहतात. मंडालेतून आलेला हा राजा रत्नागिरीतच राहिला आणि त्याच्या कुटुंबाची एक शाखा इथेच रुजली.

मंडाले आणि रत्नागिरीचा संबंध हा थिबापुरताच मर्यादित राहणार नव्हता. याच रत्नागिरीत जन्मलेल्या एका थोर व्यक्तीचा मंडालेशी संबंध येणार होता. ही व्यक्ती होती लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. रत्नागिरीत जन्मलेल्या लोकमान्य टिळकांना ब्रिटिश सरकारने राजद्रोहाच्या आरोपाखाली याच मंडालेला कारागृहात ठेवले. 1908 ते 1914 अशी सहा वर्षे लोकमान्यांना मंडालेला काढावी लागली. एकमेकांपासून हजारो किलोमीटर लांब असणारी ही गावं एकमेकांशी अशी जोडली गेली आणि इतिहासाच्या पानांमध्ये कायमची जाऊन बसली.

Web Title: More than hundred centuries of Mandalay and Ratnagiri, link to Myanmar-India relations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.