पासपोर्ट आणि अमेरिकन व्हीसा चोरीला गेल्यास काय करायचे?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 01:24 PM2018-08-27T13:24:19+5:302018-08-27T13:28:30+5:30
जर तुम्ही भारताबाहेर असाल तर तुम्ही भारताच्या दुतावासात किंवा वाणिज्यदुतावासाशी संपर्क करावा आणि नवा भारतीय पासपोर्ट मिळवावा.
प्रश्न- एका स्थानिक मॉलमध्ये माझा पासपोर्ट, अमेरिकेचा व्हीसा, लॅपटॉप आणि इतर मौल्यवान वस्तू असलेली बॅग चोरीला गेली. ही घटना मी कॉन्सुलेटला कळवावी का?
उत्तर- हो. तुमचा पासपोर्ट गेल्याची घटना स्थानिक कार्यालयांबरोबर अमेरिकन कॉन्सुलेटलाही तात्काळ कळवणं गरजेचं आहे. तुम्हाला नव्याने व्हीसा का हवा आहे हे स्पष्ट होण्यासाठी ही माहिती कळवणं अत्यंत गरजेचे आहे.
अशी काहीही घटना घडल्यास सर्वप्रथम स्थानिक पोलिसांकडे जाऊन आपण कळवावे. या घटनेचा पोलिसांकडून सर्व सविस्तर अहवाल घ्यावा. जर तुम्ही भारताबाहेर असाल तर तुम्ही भारताच्या दुतावासात किंवा वाणिज्यदुतावासाशी संपर्क करावा आणि नवा भारतीय पासपोर्ट मिळवावा.
एकदा पोलिसांकडून घटनेचा अहवाल मिळवलात की ज्या अमेरिकन दुतावास किंवा वाणिज्यदुतावासातून तुम्ही व्हीसा मिळवलात त्यांच्याशी संपर्क करुन पोलिसांचा अहवाल द्या. जेव्हा तुम्ही व्हीसा हरवल्याचे कळवाल तेव्हा तो सिस्टिममधून रद्द केला जाईल. त्यानंतर जरी तुम्हाला तो परत मिळाला तरी तुम्हाला नवा व्हीसा मिळवावा लागेल.
जर तुम्ही अमेरिकेत असाल तर तुम्हाला डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीला कळवून आय-102 हा अर्ज भरुन अरायव्हल-डिपार्चर रेकॉर्ड मिळवण्यासाठी https://www.uscis.gov/i-102.येथे जावे लागेल.
अमेरिकेत असताना व्हीसा हरवला किंवा चोरीला गेला तर व्हीसा पुन्हा दिला जात नाही. तुम्ही एकदा अमेरिका सोडल्यावर पुन्हा अमेरिकेत येण्यासाठी नवा व्हीसा मिळवावा लागतो. व्हीसाची मागणी नव्याने करण्यासाठी www.ustraveldocs.com/in येथे भेट द्या.
अमेरिकेत आल्यावर सर्वांनी पासपोर्टवर आपली सर्व माहिती असलेल्या पानाची, अमेरिकन व्हीसाची, अॅडमिशन स्टॅम्पची एक प्रत सुरक्षित जागी ठेवावी असे आम्ही प्रवाशांना सुचवतो. तुम्ही अमेरिकेत कायदेशीर मार्गाने प्रवास आणि प्रवेश केला आहे याचा पुरावा म्हणून अॅडमिशन स्टॅम्पचा वापर करता येईल.