"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 10:42 AM2024-05-16T10:42:52+5:302024-05-16T10:44:07+5:30
NarendraModi Lok Sabha Elections 2024 And Pakistan : पाकिस्तानी मीडियामध्ये सध्या भारताच्या पंतप्रधानांची जोरदार चर्चा रंगली आहे. लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर नरेंद्र मोदी सर्वात आधी पाकिस्तानात येणार असल्याचा मोठा दावा केला जात आहे.
पाकिस्तानी मीडियामध्ये सध्या भारताच्या पंतप्रधानांची जोरदार चर्चा रंगली आहे. लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर नरेंद्र मोदी सर्वात आधी पाकिस्तानात येणार असल्याचा मोठा दावा केला जात आहे. त्याच वेळी, पाकिस्तानी मीडियामध्ये चालू असलेल्या बातम्यांवरून असे दिसते की पाकिस्तानमधील लोकांना पूर्ण विश्वास आहे की, यावेळी पुन्हा मोदी भारतात निवडणूक जिंकणार आहेत. एका मीडिया शो दरम्यान, एका वरिष्ठ पाकिस्तानी पत्रकाराला जेव्हा पंतप्रधान मोदींच्या पाकिस्तान दौऱ्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी हैराण करणारी उत्तरं दिली.
पाकिस्तानी यूट्यूबर शोएब चौधरीनेही पाकिस्तानी मीडियाची एक क्लिप प्ले केली आहे, ज्यामध्ये पंतप्रधान मोदी पाकिस्तानात येत असल्याचा दावा केला जात आहे. खरं तर, एका मीडिया शोमध्ये एका महिला पत्रकाराने पाकिस्तानचे ज्येष्ठ पत्रकार हसन निसार यांना विचारलं होतं की, पाकिस्तानचे राजकीय तज्ज्ञ म्हणतात की लोकसभा निवडणुकीत जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी पाकिस्तानला भेट देणार आहेत का?
यावर उत्तर देताना हसन निसार म्हणाले की, "नरेंद्र मोदी यांनी असं केलं तर ती तारीख इतिहासात नोंदवली जाईल. नरेंद्र मोदी नेल्सन मंडेला यांच्या पदावर जातील. मोदी हे जगातील सर्वात मोठ्या बहुमताचे आवडते नेते आहेत. त्यांचं पाकिस्तानात येणं ही मोठी गोष्ट असेल, ते पाकिस्तानात आल्यास आम्हाला खूप आनंद होईल."
पाकिस्तानी यूट्यूबर शोएब चौधरीने पंतप्रधान मोदींच्या पाकिस्तान दौऱ्यासंदर्भात पाकिस्तानच्या मुख्य प्रवाहातील मीडियाच्या पत्रकारांशीही संवाद साधला. यावेळी पाकिस्तानी पत्रकारांनी सांगितलं की, मोदी साहेब पाकिस्तानात येणार आहेत ही खूप आनंदाची बाब आहे, याचा पाकिस्तानला खूप फायदा होईल. यावेळी शोएबने विचारले की, दोन्ही देशांमध्ये तणाव असून, इम्रान सरकारच्या काळात भारतासोबतचा व्यापार बंद झाला होता, यासाठी आपण पुढाकार घेऊ नये का? त्याला उत्तर देताना पाकिस्तानी पत्रकार म्हणाले की, शेजारी राष्ट्रांमध्ये व्यापार असेल तेव्हाच देशाचा विकास शक्य आहे.
याच दरम्यान एका पाकिस्तानी पत्रकाराने सांगितलं की, नरेंद्र मोदी पाकिस्तानबद्दल चांगला विचार करतात असं मला वाटत नाही, परंतु दोन्ही देशांमध्ये व्यापार झाला तर चांगलं होईल. पाकिस्तानात मीडिया मुक्त नाही आणि संपूर्ण जगातही मुक्त नाही, असं पाकिस्तानी पत्रकाराने म्हटलं आहे. आम्हाला जे पाहिजे ते आम्ही करू शकत नाही. गेल्या चार वर्षांत पाकिस्तानच्या मीडियावर दबाव वाढला आहे.