नेदरलँड पेट्रोल-डिझेल कारवर बंदी घालणार?
By admin | Published: April 20, 2016 03:01 AM2016-04-20T03:01:53+5:302016-04-20T03:01:53+5:30
अक्षय ऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी नावीन्यपूर्ण तोडगे शोधण्यात डच आघाडीवर आहेत. या देशाने २०१४ मध्ये सौर ऊर्जेवर प्रकाशमान होणारा जगातील पहिला रस्ता बांधला
अॅम्स्टरडॅम : अक्षय ऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी नावीन्यपूर्ण तोडगे शोधण्यात डच आघाडीवर आहेत. या देशाने २०१४ मध्ये सौर ऊर्जेवर प्रकाशमान होणारा जगातील पहिला रस्ता बांधला आणि प्रशंसा मिळवली. आताची त्यांची कल्पना प्रस्तावाच्या पातळीवर आहे. ती क्रांतिकारक वगैरे नसली तरी रस्ता वाहतूक क्षेत्रात पेट्रोल-डिझेलसारख्या जैविक इंधनावरील अवलंबित्व पूर्णपणे दूर करण्याची ताकद तिच्यात आहे. ही कल्पना आहे पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या सर्व कारवर बंदी घालण्याची.
लेबर पार्टीने तसा प्रस्तावच सादर केला आहे. हा प्रस्ताव अस्तित्वात आल्यानंतर इलेक्ट्रिक किंवा हायड्रोजनवर चालणाऱ्या कारला परवाना मिळेल. सध्याच्या पेट्रोल व डिझेल कार कालमर्यादा संपेपर्यंत रस्त्यावर धावू शकतील. मात्र, कालमर्यादा संपल्यानंतर केवळ ग्रीन गाड्यांनाच त्यांची जागा घेता येईल.
पर्यावरणवादी आणि इतर अनेकांनी या प्रस्तावाचे स्वागत केले असले तरी नेदरलँडमधील सर्वांनाच हा प्रस्ताव आवडला असे नाही. बहुतांश कार उत्पादक याबाबत संतुष्ट नसल्याचे समजते. डच संसदेतील लोकप्रतिनिधींचा बहुमताने या प्रस्तावाला पाठिंबा असल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे. (वृत्तसंस्था)