पाकिस्तानने पुन्हा गायले काश्मीरचे रडगाणे, दहशतवादाबाबतचे अमेरिकेने केलेले आरोप फेटाळले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2017 04:18 PM2017-08-23T16:18:50+5:302017-08-23T16:23:46+5:30
इस्लामाबाद. दि. 23 - दहशतवादाच्या मुद्द्यावरून अमेरिकेने परखड शब्दात खडसावल्यानंतर पाकिस्तानने आता पुन्हा काश्मीरचे रडगाणे गाण्यास सुरुवात केली आहे. दहशतवाद्यांना आश्रय देत असल्याच्या अमेरिकेने केलेल्या आरोपांना आज प्रत्युत्तर देत पाकिस्तानने हे आरोप फेटाऴून लावले आहेत. भौगोलिक आणि जागतिक राजकारणात पारंपरिक प्रभाव आणि अधिपत्य कायम राखण्याची नीती दक्षिण आशियामधील शांती आणि स्थिरतेला उत्पन्न झालेल्या धोक्यासाठी जबाबदार आहे, असे पाकिस्तानने म्हटले आहे.
दहशतवाद्यांना आश्रय देण्यावरून अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला खडसावले होते. त्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने पुन्हा काश्मीर मुद्द्याचा राग आळवला आहे. जम्मू काश्मीरचा वाद सातत्याने चिघळत राहणे या क्षेत्रातील शांती आणि स्थिरतेसाठी सर्वात मोठा अडथळा आहे, असे पाकिस्तानने म्हटले आहे. पाकिस्तानकडून देण्यात आलेली प्रतिक्रिया ही ट्रम्प यांच्या दक्षिण आशियाबाबतच्या नव्या धोरणानंतर समोर आली आहे.
याआधीच्या आपल्या प्रतिक्रियेत पाकिस्तानने अमेरिकेने केलेल्या आरोपांबाबत निराशा व्यक्त केली होती. जगातील कुठलाही देश दहशतवादाला पाकिस्तानएवढा बळी पडलेला नाही. त्यामुळे अमेरिकेने जाहीर केलेल्या वक्तव्यात दहशतवादाला आळा घालण्यासाठी पाकिस्तानने दिलेल्या बलिदानाकडे कानाडोळा करणे खेदजनक असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दहशतवादाच्या मुद्यावरुन मंगळावारी पाकिस्तानला पुन्हा एकदा फटकारले होते. पाकिस्तान दहशतवाद्यांना अशाचप्रकारे आश्रय देत राहिल्यास अमेरिका शांत बसून राहणार नाही, असा इशारा त्यांनी पाकिस्तानला दिला. पाकिस्तान म्हणजे दहशतवाद्यांसाठी स्वर्ग असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. फोर्ट मायर या ठिकाणी अमेरिकन सैनिकांशी संवाद साधत असताना त्यांनी पाकिस्तानला हा इशारा दिला होता.
पाकिस्तान नेहमी हिंसा पसरवणा-यांना, दहशतवाद्यांना आश्रय देत आला आहे. अमेरिकेकडून दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आलेल्या 20 संघटना अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात सक्रिय आहेत. पाकिस्तान जर अफगाणिस्तानातील आमच्या कारवाईला सहकार्य करणार असेल तर त्यांच्याकडे मिळवण्यासाठी असे बरेच काही असेल, मात्र पाकिस्तान जर दहशवाद्यांसाठी आश्रयस्थान बनणार असेल तर मात्र याचे परिणाम भोगावे लागतील, असाही इशारा ट्रम्प यांनी यावेळी दिला होता.