पाकमध्ये तुरुंग फोडण्याचा प्र्रयत्न उधळला
By admin | Published: February 13, 2016 03:42 AM2016-02-13T03:42:40+5:302016-02-13T03:42:40+5:30
पाकिस्तानी लष्कराने डॅनियल पर्लचा मारेकरी व अल-काईदाचा प्रमुख नेता अहमद ओमर सईद शेख याच्या सुटकेसाठी कारागृह फोडण्याचा प्रयत्न उधळून लावत जवळपास १००
कराची : पाकिस्तानी लष्कराने डॅनियल पर्लचा मारेकरी व अल-काईदाचा प्रमुख नेता अहमद ओमर सईद शेख याच्या सुटकेसाठी कारागृह फोडण्याचा प्रयत्न उधळून लावत जवळपास १०० खतरनाक दहशतवाद्यांना अटक केली आहे.
हे अतिरेकी अल-काईदा, लष्कर- ए- झांगवी व तेहरिक- ए- तालिबान पाकिस्तान या संघटनांशी संबंधित असून, दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी त्यांनी संयुक्त कृती पथक स्थापन केले होते, असे लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल असीम सलीम बजवा यांनी सांगितले. हल्ले घडवून आणण्यासाठी या संघटना परस्परांशी सहकार्य करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आमचा निष्कर्ष आहे, असेही ते म्हणाले.
कराची शहरात या ९७ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. मेहरान हवाई तळ, जिन्ना विमानतळ आणि पाकिस्तान हवाई दल तळ यासह इतर अनेक मोठ्या हल्ल्यांत त्यांचा सहभाग होता. या अतिरेक्यांनी उमर शेखची सुटका करण्यासाठी हैदराबाद तुरुंग फोडण्याचा कट आखला होता व तो लवकरच अमलात आणण्यात येणार होता. दहशतवाद्यांनी स्फोटके लादलेली दोन वाहने तयार ठेवली होती. ही वाहने तुरुंगाच्या दरवाजावर आदळविण्याची योजना होती. उमर याच्यासह इतर शेकडो जणांची सुटका करताना तुरुंगातील ३५ कैद्यांना ठार मारण्याची त्यांची योजना होती. डॅनियल पर्ल यांच्या हत्येप्रकरणी उमरला मृत्युदंड ठोठाविण्यात आला आहे. पर्ल द वॉल स्ट्रीट जर्नलचे पत्रकार होते. पाकची गुप्तचर संघटना आयएसआय व दहशतवादी संघटनांतील कथित संबंधांची ते बातमी काढत होते. उमर शेख भारतात कैद होता. अपहृत भारतीय विमानातील १५० प्रवाशांच्या बदल्यात १९९९ मध्ये त्याची भारताने सुटका केली होती.