'पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवादी, तर आरएसएस एक दहशतवादी पार्टी', पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याचं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2017 11:10 AM2017-10-03T11:10:23+5:302017-10-03T11:13:55+5:30
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख 'निवडून आणलेला दहशतवादी' असं म्हटलं आहे. ख्वाजा आसिफ यांनी जिओ टीव्हीवर दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली.
इस्लामाबाद - पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख 'निवडून आणलेला दहशतवादी' असं म्हटलं आहे. ख्वाजा आसिफ यांनी जिओ टीव्हीवर दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. 'पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हाताला मुस्लिमाचं रक्त लागलं आहे', असं ख्वाजा आसिफ यावेळी बोलले आहेत. ख्वाजा आसिफ यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करताना 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक दहशतवादी पार्टी', असल्याचं म्हटलं आहे.
'अशा देशाबद्दल काय बोलायचं ज्यांनी एका दहशतवाद्याला निवडून आणलं आहे', असं ख्वाजा आसिफ कार्यक्रमात बोलले आहेत. ख्वाजा आसिफ यांनी यावेळी दावा केला आहे की, 'भारतात गोरक्षणाच्या नावाखाली मुस्लिम, दलित आणि ख्रिश्चनांची हत्या केली जात आहे'. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधत उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपाला उच्चभ्रू हिंदूंमुळे बहुमत मिळाल्याचा दावा केला.
मुलाखतीत ख्वाजा आसिफ यांनी कुलभूषण जाधव यांची सुटका करण्यासाठी पेशावर लष्करी शाळेवरील हल्ल्यात सहभागी दहशतवाद्याला सोडण्याची ऑफर मिळाल्याच्या वृत्ताचं खंडन केलं आहे. संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण बैठकीत भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे संतपालेल्या ख्वाजा आसिफ यांनी हे वक्तव्य केलं असल्याचं बोललं जात आहे. संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानवर निशाणा साधत खडे बोल सुनावले होते.
'आम्ही वैज्ञानिक तयार केले, तुम्ही दहशतवादी आणि जिहादी तयार केले'
आम्ही वैज्ञानिक तयार केले, तुम्ही दहशतवादी आणि जिहादी तयार केले अशा सणसणीत शब्दांत केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला सुनावलं होतं. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत बोलताना सुषमा स्वराजांनी सडेतोड भाषण करत पाकिस्तानला एकामागोमाग एक चपराक लगावल्या. यावेळी त्यांनी भारतावर आरोप करणा-या पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खान अब्बासी यांना ज्या देशाने दहशतवाद आणि हिंसेच्या सर्व सीमा पार केल्या आहेत तो देश आम्हाला अहिंसा आणि मानवता शिकवत होता असा टोला लगावला.
आम्ही गरिबीशी लढत आहोत, पण पाकिस्तान आमच्याशी लढत आहे असं सांगत सुषमा स्वराजांनी आपल्या भाषणास सुरुवात केली. यावेळी त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खान अब्बासी यांचं भाषण सुरु असताना प्रत्येकजण 'कोण बोलतंय ते पहा' (Look who is talking) असं बोलत होतं असा टोलाही लगावला.
'कुलभूषण जाधव यांच्या मोबदल्यात दहशतवादी देण्याची ऑफर म्हणजे पाकिस्तानचं काल्पनिक खोटं'
भारताने शुक्रवारी पुन्हा एकदा पाकिस्तानचा खोटारडेपणा उघडा पाहत खडे बोल सुनावले. कुलभूषण जाधव यांची सुटका करण्यासाठी भारताने पेशावर आर्मी पब्लिक स्कूलवर हल्ला करण्या-या दहशतवाद्याला सोडण्यास तयार असून अदलाबदली करण्याची ऑफर दिल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. भारताने पाकिस्तानचा खोटारेडपणा उघड करत हे पाकिस्तानचं अजून एक काल्पनिक खोटं आहे असं सांगितलं होतं.
'अफगाण राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कार्यालयाकडून जारी करण्यात आलेली प्रेस रिलीज तुम्ही सर्वांनी पाहिली आहे. प्रेस रिलीज पाहिली तर पाकिस्तानने आपल्या लांबलचक यादीत अजून एक काल्पनिक खोटं जोडलं आहे. पाकिस्तानने अजून एक आपण स्वत: रचलेली स्टोरी जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे', असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार बोलले होते.