घृणास्पद ! 81 महिलांवर बलात्कार करुन सीरिअल किलरनं केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 03:54 PM2018-01-11T15:54:40+5:302018-01-11T16:54:45+5:30
'मला शहराला वेश्यामुक्त बनवायचं होतं म्हणून मी सफाईचं काम करत होतं', अशी धक्कादायक माहिती पोपकोवने दिली. महिलांना मारण्यासाठी तो कुऱ्हाड आणि हातोडा वापरत असे.
मॉस्को - 22 महिलांची बलात्कार करुन हत्या करणाऱ्या सिरिअल किलरनं आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. 22 महिलांचा बलात्कार करुन हत्या केल्याच्या आरोपाखाली दोन वर्षापासून तुरुंगात आसलेल्या रशियाच्या या सीरियल किलरनं आपण अशाचप्रकारे आणखी 59 खून केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी यातील 47 गुन्ह्याची नोंद केली आहे. तर 12 गुन्ह्याचा तपास सुरु आहे. मिखाइल पोपकोव असं या आरोपीचं नाव असून तो पोलीस सेवेत कार्यरत होता. स्थानिक वृत्तपत्र सायबेरियन टाईम्सनुसार 1992 ते 2010 या कालावधीत त्यानं हे अमानूष हत्याकांड केलं आहे. मिखाइल पोपकोवच्या या धक्कादायक खुलाशामुळं संपूर्ण रशियामध्ये खळबळ माजली आहे.
मिखाइल पोपकोव सध्या 22 महिलांचा बलात्कार आणि खुनाच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असून त्याच्यावर आणखी 47 गुन्ह्याची नोंद केली आहे. आणि 12 गुन्ह्याचा तपास सुरु आहे. त्यामुळं त्याच्यावर एकून 81 महिलांवर बलात्कार आणि खून करण्याचा गुन्हा दाखल होईल. रशियामध्ये सर्वात मोठ्या सीरिअल किलरचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.
'मला शहराला वेश्यामुक्त बनवायचं होतं म्हणून मी सफाईचं काम करत होतं', अशी धक्कादायक माहिती पोपकोवने दिली. महिलांना मारण्यासाठी तो कुऱ्हाड आणि हातोडा वापरत असे. तसेच ज्या महिला नशेत असायच्या त्याच महिलांना लिफ्ट देत असल्याचीही त्यानं कबुली दिली. 2012मध्ये एका प्रकरणात अटक झाल्यानंतर पोपकोवनं केलेल्या या अमानुष हत्याकांडाचा पर्दाफाश झाला.
स्थानिक वृत्तपत्र सायबेरियन टाईम्सनुसार, पोलीस सेवेत असताना रात्रीच्या वेळी पोलिसांच्या गाडीत पोपकोव महिलांना लिफ्ट देत असे. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी गाडी पाहून महिला या नराधमाच्या गाडीत बसत असत. मात्र यानंतर आपल्यासोबत काय अघटीत घडणार याची पुसटशीही कल्पना या महिलांना नसायची. पोपकोव नेहमी त्याच्या सुट्टीच्या दिवशीच अशाप्रकारचं दुष्कर्म करायचा. हत्येसाठी तो त्याच्या जवळच्या परिसराची निवड करायचा. महिला गाडीत बसल्यानंतर एखाद्या निर्जनस्थळी नेऊन तो त्या महिलांची हत्या करायचा. त्याला 22 हत्यांसाठी आधीच दोषी ठरवण्यात आलं आहे, मात्र त्यानं कबुली दिलेल्या आणखी 59 हत्यांची माहिती खरी ठरली तर हे रशियातलं सर्वात मोठं हत्याकांड ठरेल. रशियात याआधी सीरिअल किलर अलेक्झांडरला 48 हत्यासाठी तर अँड्रेई चिकटिलो याला 52 हत्यांसाठी दोषी ठरवण्यात आलं होतं.