संपूर्ण अमेरिका येणार उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्राच्या रेंजमध्ये, अण्विक हल्ला करणेही शक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2017 11:08 AM2017-11-29T11:08:10+5:302017-11-29T13:10:02+5:30
आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणीनंतर अण्वस्त्र संपन्न होण्याचे आपले उद्दिष्टय पूर्ण झाल्याचे उत्तर कोरियाने बुधवारी जाहीर केले.
नवी दिल्ली - आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणीनंतर अण्वस्त्र संपन्न होण्याचे आपले उद्दिष्टय पूर्ण झाल्याचे उत्तर कोरियाने बुधवारी जाहीर केले. या चाचणीनंतर संपूर्ण अमेरिका आपल्या क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात आली आहे असे उत्तर कोरियाने सांगितले. वॉसाँग-15 ची चाचणी पाहिल्यानंतर उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनने अणवस्त्र संपन्न राष्ट्र होण्याचे आपले उद्दिष्टय पूर्ण झाल्याचे अभिमानाने जाहीर केले.
वॉसाँग-15 अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असलेले आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. उत्तर कोरियाची चाचणी यशस्वी ठरली असेल तर उत्तर कोरियाला यापुढे अमेरिकेवर थेट अण्वस्त्र हल्ला करता येईल. उत्तर कोरियाच्या या चाचणीचा अमेरिकेसह जगातील अनेक देशांनी निषेध केला असून यामुळे जगाची चिंता आणखी वाढली आहे. कारण उत्तर कोरियाचा आक्रमकपणा जगाला युद्धाच्या दिशेने नेणारा आहे.
जवळपास अडीच महिन्याच्या शांततेनंतर उत्तर कोरियाच्या कृतीमुळे कोरियन द्विपकल्पात तणाव आणखी वाढला आहे. त्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणी ही संपूर्ण जगासाठी धोकादायक असल्याचे अमेरिकेच्या संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांनी सांगितले आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली होती. दरम्यान, 'या प्रकरणात आपण लक्ष घालू,' असे ट्विट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. दक्षिण कोरियाच्या म्हणण्यानुसार, उत्तर कोरिया 2018 पर्यंत आण्विक क्षेपणास्त्र लॉन्च करण्यात सक्षम होईल.
दहशतवादाला पाठिंबा देणा-या देशांच्या यादीत आता उत्तर कोरियासुद्धा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता एक नवी घोषणा केली आहे. उत्तर कोरियाला दहशतवादाचं समर्थन(sponsor of terrorism) करणा-या देशांच्या यादीत पुन्हा एकदा टाकण्यात आलं आहे. 9 वर्षांपूर्वीसुद्धा उत्तर कोरियाचं नाव या यादीत टाकण्यात आलं होतं. त्यानंतर जॉर्ज डब्लू बुश यांच्या शिष्टाईमुळे ते हटवण्यात आलं होतं. डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला दहशतवाद पुरस्कृत देश असल्याचं जाहीर केलं आहे. खरंतर हे आधीच करायला हवं होतं, असंही ट्रम्प म्हणाले आहेत.
उत्तर कोरियाने फक्त युद्ध जरी पुकारलं तरी होईल लाखो लोकांचा मृत्यू
उत्तर कोरिया अमेरिकेसहित संपुर्ण जगाला अणुबॉम्बची भीती दाखवत आहे. एका रिपोर्टनुसार, जर उत्तर कोरियाने युद्ध पुकारलं, आणि अणुबॉम्ब शस्त्रांचा वापर केला नाही तरी लाखो लोकांचा मृत्यू होईल. परिस्थिती इतकी भयानक असेल की, पहिल्याच दिवशी तीन लाख लोकांचा मृत्यू होईल.