सू की यांना म्यानमारचे अध्यक्ष सत्ता सोपविणार
By admin | Published: November 16, 2015 12:11 AM2015-11-16T00:11:00+5:302015-11-16T00:11:00+5:30
आपल्या नेतृत्वाखालील विद्यमान सरकारने सुधारणा केल्यानेच आँग सॅन सू की यांच्या पक्षाला मोठा विजय मिळाल्याचा दावा म्यानमारचे अध्यक्ष थेन सीन यांनी केला असून, सत्ता हस्तांतरण सुलभरीत्या केले जाईल
यंगून : आपल्या नेतृत्वाखालील विद्यमान सरकारने सुधारणा केल्यानेच आँग सॅन सू की यांच्या पक्षाला मोठा विजय मिळाल्याचा दावा म्यानमारचे अध्यक्ष थेन सीन यांनी केला असून, सत्ता हस्तांतरण सुलभरीत्या केले जाईल, असे स्पष्ट केले आहे.
थेन सेन हे माजी लष्करी जनरल आहेत. गेली पाच वर्षे त्यांचीच राजवट होती. येथे राजकीय पक्षांच्या बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले की, राजकीय आणि आर्थिक सुधारणांचे फलित ८ नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीतून दिसून आले आहे.
आम्ही सुधारणांचे आश्वासन दिले होते. त्याची आम्ही अंमलबजावणी केली असून, त्याचाच निष्कर्ष आता दिसत आहे. सुधारणांची ही प्रक्रिया नवीन सरकारकडे सुपूर्द करू. सत्ता हस्तांतरणाबाबत कोणीही काळजी करू नये. निवडणुका कोणत्याही लोकशाही देशाचे ‘कर्तव्य’च आहे.
या बैठकीला जवळपास ९० राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या निवडणुकीत सू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रॅसी या पक्षाला दोन तृतीयांश जागा मिळाल्या आहेत. या निवडणुका स्वतंत्र आणि निष्पक्ष झाल्या असल्याचे स्पष्ट झाले, असे थेन सेन यांनी गेल्या रविवारी म्हटले होते. (वृत्तसंस्था)