ट्रुओंग माय लॅन! बाईंनी खाल्ले १२ अब्ज डॉलर्स; एक लाख कोटी रुपये स्वत:कडेच ठेवले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 05:41 AM2024-04-25T05:41:36+5:302024-04-25T05:42:03+5:30

‘व्हॅन थिन्ह फॅट’ या कंपनीच्या लॅन या अध्यक्ष. त्यांनी आपल्या पदाचा वापर करून सायगॉन कमर्शिअल बँकेकडून (एससीबी) खूप मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं. हा सगळा पैसा त्यांनी आपल्या कंपनीकडे तर वळवलाच, पण त्यातून स्वत:चंही उखळ पांढरं करून घेतलं.

Truong My Lan's death sentence by court due to Vietnam's anti-corruption drive | ट्रुओंग माय लॅन! बाईंनी खाल्ले १२ अब्ज डॉलर्स; एक लाख कोटी रुपये स्वत:कडेच ठेवले

ट्रुओंग माय लॅन! बाईंनी खाल्ले १२ अब्ज डॉलर्स; एक लाख कोटी रुपये स्वत:कडेच ठेवले

आजकाल रोज कुठे ना कुठे, काही ना काही, कसला ना कसला अपहार होतच असतो. त्याचे प्रकारही किती आणि त्या माध्यमातून होणारा गफलाही किती मोठा! या अशा अपहारांच्या रकमांचे नुसते आकडे ऐकले तरी आपल्याला गरगरायला होतं. हाँगकाँगमध्ये नुकताच एक गफला झाला. किती रुपयांची ही फसवणूक असावी? हाँगकाँगमधील ट्रुओंग माय लॅन ही ६७ वर्षीय अतिशय शक्तिशाली महिला. होची मिन्ह या शहरात या महिलेचं मोठ्या प्रमाणात आर्थिक साम्राज्य आहे. ‘व्हॅन थिन्ह फॅट’ होल्डिंग्ज ग्रुपच्या त्या अध्यक्ष. त्या रिअल इस्टेट टायकून आहेत. त्यांनी सुमारे ११ वर्षांच्या काळात १२.५ अब्ज डॉलर्सचा (सुमारे १०४४ अब्ज रुपये) घाेटाळा केला! मुख्य म्हणजे इतकी वर्षे या एवढ्या मोठ्या घोटाळ्याबद्दल या कानाची खबर त्या कानाला लागली नाही. व्हिएतनाममधला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा आर्थिक घोटाळा आहे. अपहार, लाचखोरी आणि बँकिंग नियमांचे उल्लंघन करून त्यांनी एवढ्या मोठ्या रकमेचा घोटाळा केला. व्हिएतनामच्या अर्थव्यवस्थेलाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात हादरे बसले. 

आपल्या या कारनाम्याची किंमत त्यांना अर्थातच चुकवावी लागली. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर २०२२मध्ये त्यांना अटक करण्यात आली आणि या घोटाळ्याबद्दल त्यांना आता चक्क मृत्युदंडाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे. अर्थातच एवढा मोठा घोटाळा एकट्यानं होऊ शकत नाही. घोटाळ्यात माजी केंद्रीय बँकर, सरकारी अधिकारी आणि बँकेच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांचाही हातभार आहे. न्यायालयानं लॅन यांच्यासह तब्बल ८५ अधिकाऱ्यांना दोषी ठरवलं. या सर्वांनाच नंतर अटक करण्यात आली. एवढ्या मोठ्या गुन्ह्यासाठी, खरं तर ‘देशद्रोहा’साठी शिक्षाही तेवढीच मोठी असावी अशी सर्वच स्तरांतून मागणी होत होती. त्यामुळे न्यायालयानं लॅन यांना फाशीची शिक्षा सुनावली. 

‘व्हॅन थिन्ह फॅट’ या कंपनीच्या लॅन या अध्यक्ष. त्यांनी आपल्या पदाचा वापर करून सायगॉन कमर्शिअल बँकेकडून (एससीबी) खूप मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं. हा सगळा पैसा त्यांनी आपल्या कंपनीकडे तर वळवलाच, पण त्यातून स्वत:चंही उखळ पांढरं करून घेतलं. हा घोटाळा उघडकीस येऊ नये म्हणून त्यांनी बँक अधिकारी आणि ऑडिटर्सनाही कोट्यवधी रुपयांची लाच दिली. २०१२ ते २०२२ या कालावधीत त्यांनी सायगॉन कमर्शिअल बँकेकडून ३.६६ लाख कोटींपेक्षाही जास्त रकमेची तब्बल २५०० कर्जे घेतली. या कालावधीत सायगॉन बँकेनं सगळी मिळून जी कर्जं लोकांना वाटली, त्यातले तब्बल ९३ टक्के कर्ज एकट्या लॅन आणि त्यांच्या साथीदारांना दिली गेली होती. यामुळे बँकेचंही कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं. 

लॅन यांचा बचाव करताना त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं, लॅन यांनी बँकेची कोणत्याही प्रकारे फसवणूक केलेली नाही. मुळात त्यांच्याकडे एससीबी बँकेचं कोणतंही मोठं अधिकाराचं पद नव्हतं, मग त्या कशा काय अपहार करू शकतील? परंतु न्यायाधीशांनी त्यांचं म्हणणं अमान्य केलं. न्यायाधीशांचं म्हणणं होतं, एक वेळ तर अशी होती की लॅन यांच्या जवळच्या माणसांच्या माध्यमातून एससीबी बँकेवर लॅन यांची जवळपास ९१.५ टक्के ‘मालकी’ होती! बँकेच्या त्या ‘सर्वोच्च अधिकारी’ होत्या. त्याच माध्यमातून त्यांनी हा सगळा मायापाश उभारला आणि लोकांना, बँकेला आणि राष्ट्रालाही देशोधडीला लावलं! लॅन यांनी क्रेडिट अप्रूव्हलचे अंतिम निर्णय तर घेतलेच, पण एससीबी बँकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांची नेमणूकही त्यांनीच केली होती. या सगळ्या लोकांनी आपलं तोंड बंद ठेवावं आणि आपण सांगू ते(च) त्यांनी करावं, यासाठी कोट्यवधी रुपये देऊन त्यांनी त्यांचं तोंड अक्षरश: शिवून टाकलं होतं. 

लॅनला अटक केल्यानंतर पोलिसांनी जो काही तपास केला, तपासादरम्यान जी कागदपत्रे गोळा केली आणि साक्षीदारांचे जबाब घेतले त्यात स्पष्टपणे दिसून आलं की एससीबी बँक तसेच द न्हाट आणि टिन एनघिया या बँकांमध्ये लॅनचे अप्रत्यक्षपणे अनेक शेअर्स होते. नंतर ते एससीबीममध्ये विलीन करण्यात आले. लॅननं एससीबीच्या पैशांचा वापर तिच्या कंपनीच्या गरजा भागवण्यासाठी आणि स्वत:च्या चैनीसाठी केला.

एक लाख कोटी रुपये स्वत:कडेच ठेवले! 
२०१२ ते २०१७ या काळात लॅननं स्वत:च्या स्वार्थासाठी ३६८ तारण कर्ज मंजूर करवून घेतली. त्यानंतर गहाण मालमत्तेचं मूल्य घसरल्यानं एससीबीला २१ हजार कोटींचं नुकसान झालं. त्यानंतर पुन्हा २०१८ ते २०२२ या काळात ९१६ कर्ज प्रकरणे मंजूर करवून घेतली. शिवाय वेळोवेळी घेतलेल्या कर्जातले तब्बल एक लाख कोटी रुपये स्वत:कडेच ठेवून घेतले! हे घोटाळे झाकण्यासाठी एससीबीचे सीईओ वो टॅन होआंग व्हॅन यांनी सेंट्रल बँकेच्या तपासणी विभागप्रमुखाला ४३ कोटी रुपये दिले!

Web Title: Truong My Lan's death sentence by court due to Vietnam's anti-corruption drive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.