रोहिंग्याविरोधातील हिंसाचार रोखण्यासाठी म्यानमारवर संयुक्त राष्ट्राचा दबाव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2017 10:52 AM2017-11-07T10:52:27+5:302017-11-07T10:56:55+5:30
सुरक्षा परिषदेने एकमुखाने म्यानमारमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराचा निषेध केला. तसेच या हिंसात्मक वातावरणामध्ये होत असलेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाचाही निषेध करण्यात आला.
न्यू यॉर्क- म्यानमारच्या राखिन प्रांतात रोहिंग्यांविरोधात सुरु असणाऱ्या हिंसाचाराला व गोंधळाच्या वातावरणाला तात्काळ शांत करावे असे संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने म्यानमारला सांगितले आहे. तसेच राखिनमधील लष्करी कारवाईलाही आता आवरते घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
सुरक्षा परिषदेने एकमुखाने म्यानमारमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराचा निषेध केला. तसेच या हिंसात्मक वातावरणामध्ये होत असलेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाचाही निषेध करण्यात आला. म्यानमार लष्कराच्या कारवाईमध्ये रोहिंग्यांवर हत्या, स्त्रियांवर बलात्कार, घरे जाळणे अशा प्रकारचे निषेध झाल्यामुळे त्याचीह तीव्र शब्दांमध्ये संयुक्त राष्ट्राने निषेध केला आहे आणि रोहिंग्याच्या सुरक्षेप्रती काळजी व्यक्त केली आहे. तसेच म्यानमार सरकारने राखिनमधील लष्करी कारवाई थांबवून तेथे कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा प्रस्थापित करावी अशा सूचनाही केल्या आहेत. या निवेदनामध्ये मागच्या महिन्यात फ्रान्स आणि इंग्लंडने केलेल्या सुचनांचाही समावेश आहे.
UN turns up pressure on Myanmar over Rohingya crisis https://t.co/ZKCgHZpYPopic.twitter.com/9MZrgEK0iV
— South Asian Monitor (@S_A_Monitor) November 7, 2017
सध्या बांगलादेशात गेलेल्या रोहिंग्यांना तेथे स्वच्छतेचे प्रश्न, शुद्धध पाणी तसेच औषधांचा तुटवडा अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गेल्या आठवड्यामध्ये भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांची भेट घेतल्यानंतर म्यानमारला आपल्या नागरिकांना माघारी बोलवावेच लागेल असे विधान केले होते. चार दिवसांपुर्वीच आंग सान सू की यांना दक्षिण आफ्रिकेचे आर्चबिशप डेस्मंड टूटू यांनी पत्र लिहून राखिन प्रांतात शांतता प्रस्थापित करावी अशी विनंती केली आहे. संपुर्ण जग तुला अन्यायाविरोधात लढणारी, स्वातंत्र्यासाठी लढणारी म्हणून आदर्श मानते. तुमच्या देशात चालू असलेला विवाद लवकर मिटवावा अशी अपेक्षा टूटू यांनी व्यक्त केली आहे.
म्यानमारच्या स्टेट कौन्सिलर आंग सान सू की यांनी गेल्या आठवड्यात उत्तर राखिन प्रांताचा दौरा केला. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपासून उफाळलेल्या असंतोष, जाऴपोळीच्या सत्रानंतर आंग सान सू की यांच्यावर चहूबाजूंनी टीका होत होती. सू की या प्रकरणामध्ये कोणतीही भूमिका घेत नसून त्या रोहिंग्याच्या संरक्षणामध्ये कमी पडत आहेत अशी टीका त्यांच्यावर आंतररराष्ट्रीय समुदायाकडूनही होत होती. 24 ऑगस्टपासून राखिन प्रांतातून 6 लाख रोहिंग्या बांगलादेशाच्या दिशेने पळाल्याचे सांगण्यात येते. म्यानमारच्या लष्कराकडून होणारी कथित कारवाई, बलात्कार, जाळपोळ आणि हत्या यांना घाबरून ते देश सोडून गेल्याचे सांगितले जाते.