जगभरात Fake Newsच्या बिझनेसला अच्छे दिन, होते मोठी कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 04:15 PM2017-11-17T16:15:24+5:302017-11-17T16:17:28+5:30
सोशल मीडियाच्या वाढत्या वापराबरोबरच खोट्या बातम्या पसरण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. आधीच अफवा पसरण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या आपल्या समाजात तर सोशल मीडियामुळे खोट्या बातम्या झपाट्याने पसरत आहेत.
वॉशिंग्टन - सोशल मीडियाच्या वाढत्या वापराबरोबरच खोट्या बातम्या पसरण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. आधीच अफवा पसरण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या आपल्या समाजात तर सोशल मीडियामुळे खोट्या बातम्या झपाट्याने पसरत आहेत. दरम्यान, जगभरात सायबर गुन्हेगारांकडून फेक न्यूजला (खोट्या बातम्या) मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्यात येत असून, त्याद्वारे मोठी आर्थिक कमाई करण्याचे तंत्र त्यांनी विकसित केल्याचे समोर आले आहे.
सायबर सिक्यॉरिटीवर संशोधन करणाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार फेक न्यूजचे काम 10 ( सुमारे 650) रुपयांपासून सुरू होते. ऑनलाइन सिक्युरिटी फर्म्सच्या एका अहवालात खोट्या न्यूज वेबसाईट, फेक रिव्यूज आणि सोशल मीडिया बॉट्ससारख्या सेवांची माहिती देण्यात आली आहे. सोशल मीडिया बॉट्स म्हणजे अशी ऑटोमेटेड संकेतस्थळे असतात जी वाणिज्य उत्पादने आणि सेवांच्या जाहिराती करतात. तसेच त्यांचे फायदे सोशल मीडियावर शेअर करतात.
फेक न्यूजच्या बिझनेसमधील विविध मार्गामधील एक मार्ग म्हणजे खोटी मीडिया संकेतस्थळे, यामध्ये खऱ्या मीडिया संकेतस्थळांप्रमाणेच हुबेहूब अशा खोट्या वेबसाईट डिझाइन केल्या जातात. यासाठी खऱ्या संकेतस्थळाच्या नावातील स्पेलिंगमधील एखादा शब्द बदलून त्याच नावाची बेवसाइट बनवली जाते. आतापर्यंत अशा दोन हजार 800 खोट्या वेबसाइट्स उघड झाल्या आहेत.
काही सायबर गुन्हेगार रशियामधून अशा अफवा पसरवण्याच्या या धंद्याचा कारभार पाहत असतात. ते खऱी आणि वैध माहिती आणि कागदपत्रांमध्ये फेरफार करून खोटी माहिती पसरवण्याचे काम करतात. कुठल्याही चांगल्या बातमीप्रमाणेच खोट्या बातम्याही मोठ्या प्रमाणावर शेअर केल्या जातात. त्यांच्यावर लाइक, कमेंट केल्या जातात. त्यामुळे अशा बातम्या व्हायरल होतात.
खोट्या माहितीचा जेवढा प्रसार होतो. तेवढे सर्वसामान्य वाचकांना अशा बातमीकडे आकर्षित करणे सोपे जाते. त्यामुळे बातम्या पसरवणाऱ्याचा हेतू साध्य होण्याची शक्यता वाढते. आपल्या राजकीय विरोधकाबाबत अपप्रचार करणे असो, वादविवादाला तोंड फोडणे असो, वा नफा कमावण्याचा हेतू असो, फेक न्यूजमधून हे हेतू साध्य होतात. सध्या राजकीय प्रचारामध्ये होत असलेला फेक न्यूज साइट्सचा वापर तज्ज्ञांची चिंता वाढवत आहे. तसेच नफेखोरीसाठीही फेक न्यूजला प्रोत्साहन दिले जात आहे.