बुलढाण्याच्या वारकरी युवकाचा जालन्यात दगडाने ठेचून निर्घुण खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 05:14 PM2019-06-15T17:14:11+5:302019-06-15T17:25:20+5:30
भोकरदन तालुक्यातील पारध शिवारात आढळला मृतदेह
पारध (जालना ) : एका २४ वर्षीय युवकाचा दगड, लाकडी फळीने ठेचून खून केल्याची घटना पारध (ता.भोकरदन) शिवारात घडली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी समोर आली असून, या प्रकरणी पारध पोलीस ठाण्यात रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मयत युवक हा मासरूळ (जि.बुलढाणा) येथील आहे.
पारध येथील प्रभू दामू सुरडकर हे शुक्रवारी सायंकाळी शेतातून घरी येत होते. त्यावेळी श्रीरंग दगडू सुरडकर यांच्या शेतातील बांधावरील एका झाडाखाली त्यांना एका युवकाचा मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ पारध पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली. पो.ना. नारायण माळी, प्रकाश सिनकर, पो.हे.कॉ. गीते यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती वरिष्ठांना दिली. त्यानंतर भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाय, स.पो.नि. शंकर शिंदे, पो.ना. प्रकाश सिनकर, गणेश पायघन, रामेश्वर सिनकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
मयताजवळ असलेल्या कागदपत्रांची पाहणी केल्यानंतर मयताचे नाव स्वप्नील श्रीरंग भुते (वय-२४ रा. मासरूळ ता.जि.बुलढाणा) असल्याचे समोर आले. पंचनाम्यानंतर वालसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात मयताच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी पोना नारायण माळी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मारेकऱ्याविरूध्द पारध पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, लवकरच मारेकऱ्यांना जेरबंद करू, असे सपोनि शंकर शिंदे म्हणाले.
चार संशयित ताब्यात
स्वप्नील हा शुक्रवारीच पंढरपूरच्या वारीवरून घरी परतला होता. दुपारी दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांनी त्याला प्रवेशासंबंधी बोलण्यासाठी घराबाहेर नेले होते अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली. तसेच त्याच्या खिशातून रोखरक्कम आढळून आल्याने हा खून चोरीच्या उद्देशाने नसल्याचा कयास आहे. दरम्यान, पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले असून तपास सुरु आहे.