धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 11:22 PM2017-11-19T23:22:48+5:302017-11-19T23:23:05+5:30
जालना : शहरातील सार्वजनिक जागांवरील रहदारीस अडथळा ठरणाºया १०९ धार्मिक स्थळांचे अतिक्रमण नोव्हेंबरअखेर हटविण्यात येणार आहे. पोलीस बंदोबस्त मिळताच ...
जालना : शहरातील सार्वजनिक जागांवरील रहदारीस अडथळा ठरणाºया १०९ धार्मिक स्थळांचे अतिक्रमण नोव्हेंबरअखेर हटविण्यात येणार आहे. पोलीस बंदोबस्त मिळताच ही कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
महानगरपालिका व नगरपालिका हद्दीतील सार्वजनिक जागांवरील धार्मिक स्थळांची अतिक्रमणे काढून टाकण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. समितीने पालिकेच्या माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणात नवीन जालना व जुन्या जालन्यात मिळवून सुमारे ४५० ठिकाणी धार्मिक स्थळांची अतिक्रमणे आढळून आली आहेत. पैकी १७ ठिकाणची अतिक्रमणे पालिकेने या पूर्वी मोहीम राबवून काढून टाकली, तर रहदारीस अडथळा न ठरणारी बहुतांश अतिक्रमणे कायदेशीर प्रक्रिया राबवून नियमित केली आहेत. या आठवड्यात शहरातील १०९ ठिकाणी असलेली अतिक्रमणे काढून टाकण्याचे नियोजन पालिका प्रशासनाकडून सुरू आहे. यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त देण्यासाठी नगर पालिकेने पोलीस प्रशासनास लेखी पत्र दिले आहे. आवश्यक बंदोबस्त मिळताच शहरातील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरुवात करण्यात येणार आहे. तर शक्य तिथे स्थानिक नागरिकांशी चर्चा करून अतिक्रमण काढले जाणार आहे.
-----------
सार्वजनिक जागांवरही अतिक्रण
शहरातील नगरपालिकेच्या मालकीच्या अनेक सार्वजनिक जागा आहेत. मात्र, पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अतिक्रमण करून मोक्याच्या जागा बळकविण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत. परिणामी पालिकेच्या अनेक मालमत्तांबाबत वाद निर्माण झाले आहेत. शहरात पूर्वी काही भागांत असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या जागांवरही अतिक्रमण झाले आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर अनेक ठिकाणी बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकून अतिक्रमण केले जात आहे. या मुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. पालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांनी या प्रकाराकडे कानाडोळा केल्याचे पाहावयास मिळत आहे.
-------------
अतिक्रमण काढण्यासाठी पालिका प्रशासनातर्फे आवश्यक नियोजन केले जात आहे. जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रणाखाली ही कारवाई केली जाणार आहे. नोव्हेंबरअखेर सर्व धार्मिक स्थळांची अतिक्रमणे काढली जातील.
संतोष खांडेकर मुख्याधिकारी, नगर पालिका, जालना.