मोकाट कुत्र्यांकडून दहा शेळ्यांचा फडशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:45 AM2018-03-16T00:45:40+5:302018-03-16T00:45:43+5:30
काझी मोहल्ला परिसरात बुधवारी मध्यरात्री मोकाट कुत्र्यांनी शेख याकूब यांच्या दहा शेळ्यांचा फडशा पाडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. काझी मोहल्ला परिसरात बुधवारी मध्यरात्री मोकाट कुत्र्यांनी शेख याकूब यांच्या दहा शेळ्यांचा फडशा पाडला. यात शेख यांचे ८० हजारांचे नुकसान झाले. होती. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
शहरातील शेख याकूब उर्फ पप्पू शेख बुढन यांचे काझी मोहल्ला भागातील टेकडीवर घर आहे. घराच्या बाजूलाच शेळ्यांसाठी पत्र्याचा गोठा आहे. शेख याकूब यांनी बुधवारी सायंकाळी ६ ते ७ वाजेच्या दरम्यान शेळ्या गोठ्यामध्ये बांधल्या व ते घरी गेले. मध्यरात्री शहरातील पंधरा ते वी मोकाट कुत्र्यांनी शेळ्या बांधलेल्या गोठ्यावर हल्ला करून गोठ्यातील १२ शेळ्या पैकी तब्बल १० शेळ्यांचा पडशा पाडला. एवढ्यावर न थांबता शेळ्यांना गोठ्याच्या बाहेर ओढून आणत त्यांचे लचके तोडले. गुरुवारी सकाळी काही नागरिकांना घरासमोर मृतावस्थेतील शेळ्या व कुत्रे दिसले. सर्वत्र रक्त सांडलेले होते. त्यामुळे या मोहल्यात एकच गोधळ उडाला. त्यानंतर शेख याकूब यांनी भोकरदन पोलीस ठाण्यात तक्रार दिली.