सेम टू सेम फोटोमुळे जुळ्यांना बसला फटका, एक भाऊ मतदानापासून राहिला वंचित
By शिवाजी कदम | Published: May 14, 2024 12:58 PM2024-05-14T12:58:45+5:302024-05-14T13:02:45+5:30
मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर एका भावाचे नाव यादीतून कमी केल्याचे समजले, कारणही आले समोर...
जालना : जालना लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीमध्ये सारख्या दिसणाऱ्या व्यक्तींची नावे कमी केलेली आहे. याचा फटका जालना शहरातील जुळ्या भावंडांना बसला आहे. जुळे असल्यामुळे दोघांचे फोटो यादीमध्ये एकसारखे दिसतात. आयोगाने दोन्ही मतदार एकच असल्याचे समजून एका भावाचे नाव यादीतून कमी केले आहे. यामुळे एका भावास मतदान करता आले नाही.
यंदाच्या निवडणुकीत भारत निवडणूक आयोगाने दुबार फोटो असणाऱ्या मतदारांची नावे यादीतून काढून टाकली आहेत. यामुळे दोन ठिकाणी नावे असणाऱ्या मतदारांची नावे यादीतून काढून टाकण्यात आलेली आहेत. मात्र, प्रक्रियेचा फटका जुळ्या असणाऱ्या मतदारांना बसला आहे.
सारख्या फोटोंमुळे नाव कमी
जालना शहरातील रहिवासी असलेल्या मनीत कक्कड व मनजित कक्कड हे जुळे भाऊ अगदी सेम दिसतात. यामुळे त्यांचे फोटोदेखील तंतोतंत जुळतात. मात्र, निवडणूक आयोगाने मनजित कक्कड यांचे नाव मतदार यादीतून कमी केले आहे. मनजित कक्कड हे भाग्यनगर परिसरातील सुरेखा बालक मंदिर येथील मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर त्यांचे नाव यादीतून कमी केल्याचे समजले. त्यांनी अधिकाऱ्यांशी चौकशी केल्यानंतर सारख्या फोटोंमुळे नाव काढून टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.