दुचाकी चोरी, घरफोडी करणारी टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 01:26 AM2018-08-24T01:26:10+5:302018-08-24T01:26:40+5:30
बंद असलेले घर हेरून चोरी करणारे व सार्वजनिक ठिकाणाहून गर्दीचा फायदा घेत दुचाकी पळविणाऱ्या टोळीचा जालना दरोडा प्रतिबंधक पथकाने पर्दाफाश केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : बंद असलेले घर हेरून चोरी करणारे व सार्वजनिक ठिकाणाहून गर्दीचा फायदा घेत दुचाकी पळविणाऱ्या टोळीचा जालना दरोडा प्रतिबंधक पथकाने पर्दाफाश केला आहे. पाच आरोपींना गजाआड करत त्यांच्याकडून २३ दुचाकींसह साडे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मागील काही दिवसांपासून चोºया व दुचाकी पळविण्याच्या घटना वाढल्या होत्या. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. चोरट्यांना तात्काळ ताब्यात घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याचे आवाहन जालना पोलिसांसमोर होते. हाच धागा पकडून जालना पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवली. याचवेळी एडीएसचे प्रमुख पो.नि.यशवंत जाधव यांना घरफोडी करणारे दोघे परतूर तालुक्यातील आष्टीची माहिती मिळाली. त्यांनी सापळा लावून अंगद पंडितराव थोरात व अमोल शिवाजी थोरात यांना ताब्यात घेतले. खाक्या दाखविताच त्यांनी आपला गुन्हा कबूल केला.
त्यानंतर दुचाकी चोरीच्या तपासाला सुरूवात केली. २० आॅगस्ट रोजी आनंद शहादेव खुळे (रा.भिवगाव, ता.देऊळगाव राजा), दिगंबर बाबासाहेब किंगर (रा.भोसा, ता.सिंदखेड राजा) व बालाजी विजय बरकुले (रा.आष्टी, ता.परतूर) यांना ताब्यात घेतले.
चौकशी केली असता त्यांनी जालना, औरंगाबाद जिल्ह्यातून दुचाकी चोरल्याचे कबूली दिली.
या दुचाकी कोठे विक्री केल्या, याचा तपास केला असता आरोपींनी सात जणांची नावे सांगितली. त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात असून त्यांच्या विरोधातही कारवाई केली आहे.
या टोळीकडून २३ दुचाकी व इतर असा सहा लाख दहा हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. सध्या ताब्यातील सर्व आरोपींना पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.