रामखेडा येथे युवकाचा निर्घृण खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 01:14 AM2019-05-16T01:14:48+5:302019-05-16T01:14:57+5:30
स्वत:च्या घरात एकटा झोपलेल्या एका युवकावर धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याची घटना बदनापूर तालुक्यातील रामखेडा येथे बुधवारी सकाळी उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : स्वत:च्या घरात एकटा झोपलेल्या एका युवकावर धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याची घटना बदनापूर तालुक्यातील रामखेडा येथे बुधवारी सकाळी उघडकीस आली. संतोष हनुमान कुरधने (२२) असे मयताचे नाव आहे.
मूळचे नंदापूर (ता. जालना) येथील रहिवासी असलेले कुरधने कुटुंब १० वर्षांपासून रामखेडा येथे मजुरीसाठी स्थायिक झाले आहे. आई-वडील शेजारील कुटुंब बाहेरगावी गेल्यामुळे त्यांच्याकडे झोपण्यासाठी गेले होते. स्वत:च्या घरात एकटाच झोपलेल्या संतोष कुरधनेचा डोक्यात वार करून खून करण्यात आला.
बुधवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर गावात खळबळ उडाली.
यामुळे घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली होती. घटनास्थळी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, एडीसचे यशवंत जाधव, यांच्यासह बदनापूरचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोंदकर आदींनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. याचा तपास तातडीने लावणार असल्याचे यशवंत जाधव म्हणाले.
या तरुणावर काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने हल्ला केला होता. तेव्हा बदनापूर पोलीस ठाण्यात ३०७ अन्वये गुन्हा दाखल झाला होता.
यामुळे खून कोणत्या कारणामुळे करण्यात आला याचा शोध पोलीस घेत आहेत. मृतदेह बदनापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी हलविण्यात आला आहे.