जळगाव जिल्ह्यातील वनक्षेत्रात 7 वाघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 01:01 PM2017-07-29T13:01:48+5:302017-07-29T13:03:05+5:30
जागतिक व्याघ्रदिन : वाघांच्या अधिवासासाठी अनुकूल वनक्षेत्र
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 29 - जिल्ह्यातील वनक्षेत्र हे वाघांच्या अधिवासासाठी अनुकूल असून अन्नसाखळी पूर्ण झालेली असल्याने यावल अभारण्यात सुमारे 3 तर मुक्ताईनगर रेंजमध्ये वढोदा, चारठाणा परिसरात दोन मोठे व दोन बछडे असे 7 वाघ आढळून आले असल्याची माहिती वनविभागातील सूत्रांनी दिली.
2010 मध्ये रशियात झालेल्या ‘टायगर समिट’ मध्ये वाघांच्या अस्तित्वाचे महत्त्व जगाला पटवून देण्यासाठी तसेच त्याचा अधिवास असलेले वनक्षेत्र जपण्याचे आवाहन करण्यासाठी 29 जुलै रोजी ‘जागतिक व्याघ्रदिवस’ साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार दरवर्षी हा व्याघ्रदिवस वनविभागातर्फे साजरा केला जातो. तसेच त्यासाठी विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते.
यंदा मु.जे. महाविद्यालय व नूतन मराठा महाविद्यालयातील विद्याथ्र्याना वनक्षेत्र जपण्याबाबत जनजागृतीपर चित्रफित दाखविण्यात येणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी यांनी दिली.
मुक्ताईनगर वढोदा, चारठाणा, कु:हाकाकोडा रेंजमध्ये पूर्वी 1 वाघीण होती. 12 हजार हेक्टरचे हे वनक्षेत्र ‘मुक्ताई-भवानी संरक्षित क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले. आता या वनक्षेत्रात 2 मोठे वाघ तर दोन बछडे आढळून येतात. या वनक्षेत्रातील अन्नसाखळी पूर्ण झालेली असल्यानेच वाघांचा अधिवास असल्याचे मानले जाते. तर यावल अभारण्यात सुमारे 3 वाघांचा वावर असल्याचे समजते. या जंगलात बिबटे, अस्वल, लांडगे, कोल्हे यासह विविध वन्य प्राणीही आहेत.
सोशल मीडियावर वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीजवळ वाघ दिसल्याचा व्हीडीओ व्हायरल झाला होता. त्याची दखल घेत उपवनसंरक्षक रेड्डी तसेच सहायक वनसंरक्षक डी.आर. पाटील यांनी त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. मात्र हा व्हीडीओ चंद्रपूर येथील असल्याचे स्पष्ट झाले.