आर्थिक विवंचना व वेदना असह्य झाल्याने ‘त्याने’ घरीच कापला पाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 03:47 PM2017-07-26T15:47:36+5:302017-07-26T16:02:48+5:30
जळगाव जिल्ह्यातील सावखेडासीम येथील रुग्णांने घेतला टोकाचा निर्णय
ऑनलाईन लोकमत दहिगाव, जि.जळगाव,दि.26 - पायाच्या वेदना असह्य होत असताना, चार रुग्णालयाकडून उपचार घेऊनही पाय दुरुस्त न झाल्याने अखेर आर्थिक अडचणींमुळे जहांगीर बाबू तडवी या रुग्णाला घरी परत लागले. वेदना असह्य होत असल्याने शेवटी स्वत:चा पाय चाकूने चुलत भावाकडून कापून घ्यावा लागला. सध्या या रुग्णाची प्रकृती चांगली असली तरी वैद्यकीय उपचाराची आवश्यकता असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. सावखेडासीम येथील जहांगीर बाबू तडवी हा ट्रॅक्टरचालक आहे. 29 जून रोजी अचानक त्याच्या डाव्या पायांच्या रक्तवाहिनीतील रक्त गोठल्यासारखे झाले. परिणामी त्याचे पायी चालणे बंद झाले. त्याला कुटुंबीयांनी फैजपूर, सावदा, भुसावळ येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचारार्थ नेले होते. मात्र, पायाचे दुखणे कायम होते. शेवटी जळगाव येथील डॉ.चेतन काकलिया यांच्या रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांनीही पायाची दुरुस्ती होणार नाही, म्हणून मुंबई, औरंगाबाद येथे जाण्याचा सल्ला दिला. मात्र, आर्थिक संकट, जेमतेम परिस्थिती असल्याने तो घरीच परतला. 21 रोजी पायाच्या पोटरीत पल्स वाढल्याने त्यातील मांस पूर्ण कुजलं आणि पाय गुडघ्यापासून अचानक गळाला. वेदना खूप होत असल्याने जहांगिर यांचा चुलतभाऊ अकबर हसन तडवी याने धारदार चाकूने पाय कापला व तत्काळ त्याचे पायाचे ड्रेसिंग करून प्राथमिक आरोग्य केंद्र येथे केले. पाय कापल्याने रुग्णाची प्रकृती चांगली आहे. सध्या त्याच्यावर सावखेडासीम येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. उमाकांत बारी प्राथमिक उपचार करीत आहेत. जहांगीरने घरच्या घरी पाय कापला, हे चुकीचे आहे. ते घातकही ठरू शकते. त्याच्यावर प्राथमिक उपचार करीत आहे. त्यामुळे वाढणारा त्रास कमी झाला आहे. मात्र, त्याला मोठय़ा रुग्णालयात उपचार घेण्याची नितांत गरज आहे. - डॉ. उमाकांत बारी, सावखेडासीम