भाजपची घोडचूक, स्वातंत्र्य दिनाऐवजी 'प्रजासत्ताक दिन' साजरा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 02:11 PM2018-08-15T14:11:21+5:302018-08-15T14:12:28+5:30
भाजपकडून 15 ऑगस्टनिमित्त "प्रजासत्ताक दिन" साजरा करणार असल्याचे नमूद केले गेले. विशेष म्हणजे 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन असतो, हेही भाजपच्या स्थानिक नेत्यांना समजले नाही.
नेरी (जळगाव) - नेरी येथून जवळ असलेल्या पळसखेडा येथे भाजपच्यावतीने सकाळी ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पक्षातर्फे तसे रितसर आमंत्रण पत्रिका परिसरात वाटण्यात आल्या होत्या. मात्र, यात 15 ऑगस्टनिमित्त "प्रजासत्ताक दिन" साजरा करणार असल्याचे नमूद केले गेले. विशेष म्हणजे 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन असतो, हेही भाजपच्या स्थानिक नेत्यांना समजले नाही.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर तालुक्यातील पळसखेडा येथे हा बेजबाबदार प्रकार घडून आला आहे. स्थानिक भाजप नेत्यांकडून झालेल्या घोडचुकीनंतर गावकरी आणि स्थानिक विरोधकांनी भाजप नेत्यांवर चांगलेच तोंडसुख घेतले. 15 ऑगस्ट रोजी प्रजासत्ताक दिन कसा आला यावरून संपूर्ण गावातून व परिसरातून पक्षाच्या अकलेचे तारे तोडण्यात येत आहेत. तसेच असा 'जावई शोध' कुणी लावला यावरून ग्रामस्थ पक्षाच्या कार्यकर्त्यांची खिल्ली उडवताना दिसत आहेत. सकाळपासून सोशल मीडियावर याबाबत विनोदी मेसेज पाठवून संबंधितांच्या अकलेचे तारे तोडले गेले आहेत.