जळगावात स्मिता वाघ यांचा पत्ता कट, भाजपाकडून उन्मेष पाटील यांना उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 01:11 PM2019-04-04T13:11:05+5:302019-04-04T13:12:59+5:30
जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाने आधी जाहीर केलेल्या स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द केली आहे. त्यांच्याजागी आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
जळगाव : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला जोर धरला आहे. तर, जळगाव मतदार संघात भाजपामध्ये तिकीट वाटपावरुन संभ्रमाची स्थिती निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाने आधी जाहीर केलेल्या स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द केली आहे. त्यांच्याजागी आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता जळगाव लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर आणि भाजपाचे उन्मेष पाटील यांच्यात लढत होणार आहे.
दरम्यान, भाजपाकडून उमेदवारी मिळाल्यानंतर उन्मेष पाटील यांनी आज सकाळी आपल्या प्रचारासाठी एक लाख प्रचार पत्रके जळगाव मतदार संघात वाटल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या प्रचार पत्रकांवर स्मिता वाघ यांचे पती आणि जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे नाव प्रकाशक म्हणून प्रसिद्ध करण्यात आले आहे.