धरणगावात संभाजी बिग्रेडच्या पदाधिकाऱ्यांकडून बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 06:06 PM2017-11-16T18:06:47+5:302017-11-16T18:18:57+5:30
मोबाईल नेटवर्कसाठी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर अवघ्या दोन तासांत सेवा सुरळीत
आॅनलाईन लोकमत
धरणगाव,दि.१६ : शहरासह तालुक्यातील बीएसएनएल मोबाईल चे नेटवर्क २४ तासापासून बंद असल्याने संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी दूरसंचार विभागाच्या कार्यालयात येत सबडिव्हीजनल अभियंता महाजन यांना गुरुवारी घेराव घातला. दोन तासाच्या आत सेवा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर तत्काळ दुरुस्तीचे काम करुन सेवा सुरळीत करण्यात आली.
धरणगाव तालुक्यात बीएसएनएल मोबाईल नेटवर्कबाबत ग्राहकांच्या तक्रारी आहेत. वारंवार तक्रारी करुन देखील समस्येचे निवारण होत नसल्याने ग्राहक अन्य मोबाईल कंपनीकडे जात आहेत. बुधवार १५ रोजी दुपारी २ वाजेपासून बीएसएनएल ची सेवा विस्कळीत झाल्याने ग्राहक हैराण झाले होते. संभाजी ब्रिगेड चे तालुका अध्यक्ष गोपाळ पाटील, शहर अध्यक्ष त्र्यंबक पाटील,कार्याध्यक्ष राकेश पाटील, सचिव राहूल पाटील, सहसचिव मेघराज पाटील, शहर उपाध्यक्ष तुषार पाटील, चेतन शिंपी, अविनाश चौधरी, गोलू पाटील, गोकूळ पाटील, दीपक चौधरी यांनी बीएसएनएल चे अभियंता महाजन यांच्या कार्यालयात येत घेराव घातला. सेवा बंद झाल्याबद्दल जाब विचारत दोन तासात सेवा सुरु न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. त्यामुळे बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांनी युध्दपातळीवर काम करीत १६ रोजी सेवा सुरळीत केली.