सात बळीनंतर चाळीसगाव तालुक्यातील जलवाहिनीवर पुन्हा बिबट्याचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 08:10 PM2017-12-22T20:10:53+5:302017-12-22T20:17:22+5:30
चाळीसगाव व मालेगाव तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या शिवारात बिबट्याने चक्क जलवाहिनीवरून प्रवास करताना २१ रोजी सायंकाळी नागरिकांनी पाहिले.
आॅनलाईन लोकमत
पिलखोड, ता.चाळीसगाव, दि.२२ : गेल्या पंधरवड्यात शार्प शूटरने बिबट्याला ठार केल्याची घटना ताजी असतानाच या परिसरात पुन्हा बिबट्याचे दर्शन झाले आहे. चाळीसगाव व मालेगाव तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या शिवारात बिबट्याने चक्क जलवाहिनीवरून प्रवास करताना २१ रोजी सायंकाळी नागरिकांनी पाहिले.
गेल्या सात-आठ महिन्यात बिबट्याने सात जणांचे बळी घेतले आहे. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली. यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने शार्पशूटर्सना बोलविले. प्रख्यात शार्प शूटर्स नवाबअली यांनी या बिबट्याचा यमसदनी पाठविले. यामुळे नागरिकांच्या मनातील दहशत काही प्रमाणात कमी झाली.
या घटनेला आज पंधरवडा उलटत नाही तोच चाळीसगाव व मालेगाव तालुक्याच्या सीमेवर, पिलखोडजवळ जलवाहिनीवरून बिबट्या जाताना नागरिकांनी पाहिला. २१ रोजी सायंकाळी हा बिबट्या दिसल्याचा दावा नागरिकांनी केला असून, त्याचे मोबाइलमध्ये चित्रीकरण केले आहे.