भाविकांच्या गर्दीमुळे भिमाशंकरला वाहतुकीची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 11:49 PM2017-12-25T23:49:11+5:302017-12-25T23:52:39+5:30
तब्बल तीन किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा. मंदिरात दर्शनासाठी अर्धा किलोमिटरची रांग
कुंदन पाटील
जळगाव,दि.२५ : अचानक उसळलेल्या देशभरातील भाविकांच्या गर्दीमुळे भिमाशंकर येथे सोमवारी गर्दी झाली. वाहनांची तब्बल तीन किलोमिटरपर्यंत रांग लागली असतांना मंदिर परिसरात देखील दर्शनासाठी तब्बल अर्धा किलोमिटरची रांग असल्याने अनेक भाविकांना माघारी फिरावे लागले.
सोमवारी पहाटेपासून भिमाशंकरच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ सुरु झाला. अवघ्या काही मिनिटातच भिमाशंकर येथील वाहनतळ फुल्ल झाले. त्यानंतर आलेल्या वाहनांना पार्किंगसाठी जागा न मिळाल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. तब्बल तीन किलोमीट अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. बºयाच वेळेनंतरही वाहतुककोंडी सुटत नसल्याचे पाहून भाविकांनी पायपीट सुरु केली. शर्थीच्या प्रयत्नांनी मंदिर गाठल्याचा आनंदही क्षणिक ठरला.मंदिराबाहेर भाविकांच्या गदीर्ने अर्धा किलोमीटरपर्यंतचे अंतर व्यापले होते. दर्शनकोंडी पाहून वृद्ध भाविकांचाही नाइलाज झाला आणि भिमाशंकराचे ‘दूरदर्शन’ घेत अनेकांनी परतीचा प्रवास सुरु केला. त्यानंतरही भाविकांना मनस्ताप सहन करावा लागला. वाहतुककोंडीने वाहनांना परतीचा प्रवासही अशक्य बनला. तेव्हा भाविकांनी गाडीत बसूनच वाहतूक सुरळीत होण्याची तासोंतास प्रतीक्षा करत ताटकळत बसावे लागले.
दहिसरच्या कुटुंबियांना ‘लोकमत’ चा मदतीचा हात...
सायंकाळ झाल्यावरही दर्शन होत नाही म्हटल्यावर दहिसरचे गुजराथी कुटुंबिय हतबल झाले आणि त्यांनी दुरवरुनच दर्शन घेत परतीचा प्रवास सुरु केला. मंदिरापासून दोन किलोमीटरपर्यंत पायपीट करता करता नाकेनऊ आलेल्या दोघा वृद्ध महिलांचा नाईलाज झाला आणि त्यांनी परतीचा प्रवास करणाºया वाहनधारकांकडे मदत मागायला सुरुवात केली. वाहतुककोंडीत कुठलाही चालक मदतीसाठी सरसावला नाही. तेव्हा ‘लोकमत’ ने त्यांना हात देत त्यांच्या खासगीवाहनांपर्यंत पोहचते केले.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावाने संताप
भिमाशंकर पोहोचण्याआधीचा चार किलोमीटर अंतराचा रस्ता पूर्णपणे खड्ड्यात आहे. आधीच वाहतुकीची कोंडी झाली असताना अनेकांच्या वाहनांना खड्ड्यांशी सामना करावा लागला. त्यात काही वाहनांचे नुकसानही झाले.
सलगच्या सुट्या आणि अनपेक्षित गर्दीमुळे भाविकांची गैरसोय झाली.काही चालकांच्या बेशिस्तपणामुळेही वाहतुकी कोंडी निर्माण झाली. त्यावर उपाययोजना अंमलात आणण्याचे काम सुरु आहे.
-राम पठारे, पोलीस उपविभागीय अधिकारी, खेड, पुणे