जळगावात एक लाख प्लॅस्टिक बाटल्यांपासून २० तास ५५ मिनिटात साकारले ‘श्री गणपती म्युरल’, जागतिक विक्रमास गवसणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 12:38 PM2018-09-12T12:38:56+5:302018-09-12T12:39:33+5:30
एकलव्य क्रीडा संकूलच्या मैदानावर अखंडपणे काम
जळगाव : फेकलेल्या प्लॅस्टिकच्या एक लाख रिकाम्या बाटल्यांमध्ये रंग भरून जळगावात २० तास ५५ मिनिटात ‘श्री गणपती म्युरल’ साकारण्यात आले. जळगावातील एकलव्य क्रीडा संकुलाच्या मैदानावर मंगळवारी दुपारी १२ वाजता सुरुवात झालेले हे काम बुधवारी सकाळी ९.२५ वाजता पूर्ण झाले. ३६ तासात पूर्ण करण्याचे उद्दीष्ट असताना त्यापूर्वीच हे काम पूर्ण करण्यात आले. या उपक्रमाने जागतिक विक्रमास गवसणी घातल्याचा विश्वास व्यक्त केला जात असून आता केवळ इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड आणि एशिया बुक आॅफ रेकॉर्डसमध्ये त्याची नोंद होण्याचे प्रमाणपत्र मिळण्याची प्रतीक्षा आहे.
खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीतर्फे ‘आनंदयात्री डॉ.जी.डी.बेंडाळे’ यांच्या जन्मशताब्दी समारोपाच्या प्रकट कार्याक्रमानिमित्त एक लिटरच्या एक लाख प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये रंग भरून भव्य असे ‘श्री गणपती म्युरल’ची पूर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर मंगळवारी दुपारी १२ वाजता ते साकारण्यास प्रत्यक्ष सुरुवात झाली.
ओजस्विनी कला महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश काटे व ५० सहकाऱ्यांनी हे म्युरल तयार केले. ‘श्री गणपती म्युरल’ पाहण्यासाठी १३ ते २२ सप्टेंबर दरम्यान नागरिकांसाठी खुले राहणार आहे. म्युरल तयार करण्यास सुरुवात झाल्यानंतर येथे प्रत्येक स्वयंसेवक मोठ्या आवडीने या कामात रमून गेले होते. अत्यंत नियोजनबद्ध बाटल्यांची रचना करून हळूहळू गणरायाचे रुप साकारल्याने ते लक्ष वेधून घेत आहे.