सामाजिक बांधिलकी जोपासत गणेश मंडळे व पोलिसांनी राज्यासमोर निर्माण केला आदर्श
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 04:19 PM2017-10-15T16:19:32+5:302017-10-15T16:22:48+5:30
बेटी बचाव बेटी पढाव, शेतकरी आत्महत्या यासह सामाजिक बांधिलकी जोपासणारे विविध प्रकारचे देखावे, शिस्तबध्द मिरवणूक व निर्माल्य रथ तयार करुन लागलीच केलेली स्वच्छता आदी उपक्रम पाहता शहरातील गणेश मंडळे व पोलिसांनी राज्यासमोर एक आदर्श निर्माण केल्याचे गौरवोद्गार जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी रविवारी गणेश मंडळाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात काढले.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,१५: बेटी बचाव बेटी पढाव, शेतकरी आत्महत्या यासह सामाजिक बांधिलकी जोपासणारे विविध प्रकारचे देखावे, शिस्तबध्द मिरवणूक व निर्माल्य रथ तयार करुन लागलीच केलेली स्वच्छता आदी उपक्रम पाहता शहरातील गणेश मंडळे व पोलिसांनी राज्यासमोर एक आदर्श निर्माण केल्याचे गौरवोद्गार जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी रविवारी गणेश मंडळाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात काढले.
पोलीस मुख्यालयातील मंगलम सभागृहात रविवारी पोलीस दलाच्यावतीने उपविभागातील २८ उत्कृष्ट गणेश मंडळांना जिल्हाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरीत करण्यात आले. यावेळी महापौर ललित कोल्हे, आमदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, आमदार चंदूलाल पटेल, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, उपअधीक्षक सचिन सांगळे, रशिद तडवी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे, दीपक जोशी, उपमहापौर,गणेश सोनवणे, माजी उपमहापौर करीम सालार, मुकुंद मेटकर आदी उपस्थित होते. मिलिंद केदार यांनी शेरोशायरी करत सूत्रसंचालन केले. अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी आभार मानले.
डी.जे., डॉल्बीमुक्त गणेशोत्सव
जिल्ह्यात यंदा प्रथमच डी.जे. व डॉल्बी मुक्त असा गणेशोत्सव जिल्ह्यात साजरा झाला, त्याचे श्रेय हे गणेश मंडळांचेच असल्याचे प्रतिपादन पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी केले. जळगाव उपविभागात २७५ मंडळांनी गणेशोत्सवात सहभाग घेतला, त्यापैकी २८ मंडळांनी उत्कृष्ट काम करुन समाजासमोर आदर्श निर्माण केला. वाहतूक व गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गणेश मंडळाचे पदाधिकारी व निर्भया पथकाच्या तरुणींनी मोलाचे काम केल्याचे कराळे म्हणाले. यावेळी सचिन सांगळे, करीम सालार, मुकुंद मेटकर, सचिन नारळे, दीपक जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.