सुवर्णनगरी जळगावात सुवर्ण सांधेरोपण, शस्त्रक्रियेनंतर तत्काळ चालू लागले रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2018 09:54 AM2018-11-04T09:54:46+5:302018-11-04T09:56:20+5:30
गुडघ्याची झिज झाल्यानंतर रुग्णास पुन्हा पहिल्यासारखे चालता-फिरता यावे यासाठी कोणतीही अॅलर्जी नसलेले सुवर्ण मुलाम्याच्या सांध्याचे संशोधन पुढे आले असून हे सुवर्ण मुलामा असलेले सांधे सुवर्णनगरी जळगावात यशस्वीरित्या बसविण्यात आले आहे.
विजयकुमार सैतवाल
जळगाव : गुडघ्याची झिज झाल्यानंतर रुग्णास पुन्हा पहिल्यासारखे चालता-फिरता यावे यासाठी कोणतीही अॅलर्जी नसलेले सुवर्ण मुलाम्याच्या सांध्याचे संशोधन पुढे आले असून हे सुवर्ण मुलामा असलेले सांधे सुवर्णनगरी जळगावात यशस्वीरित्या बसविण्यात आले आहे.
वयाची पन्नाशी गाठल्यानंतर अनेकांना गुडघ्याचा त्रास उद्भवणे बऱ्याच प्रमाणात वाढले असून त्यामुळे अनेक जण त्रस्त असतात. इतकेच नव्हे यामुळे अनेकांचे चालणे-फिरणेही बंद होऊन जाते. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात कृत्रिम सांधेरोपण पर्याय असून गेल्या अनेक वर्षांपासून सांधेरोपण केले जात आहे.
आता यामध्ये नवीन संशोधन पुढे आले असून नेहमी वापरात येणाºया कोबाल्ट क्रोम धातूच्या कृत्रिम सांध्याऐवजी सुवर्ण मुलामा असलेला सांधा वैद्यकीय क्षेत्रात वरदान ठरत आहे. कृत्रिम सांध्याच्या शस्त्रक्रियेनंतर दोन टक्के रुग्णांना अॅलर्जी होते. ही अॅलर्जी टाळून रुग्णास कोणताही त्रास होऊ नये म्हणून सुवर्ण मुलामा असलेला सांधा बसविला जात आहे. या सांध्यामुळे कोणतीही अॅलर्जी न होता रुग्ण शस्त्रक्रियेनंतर लगेच चालू-फिरू शकत आहे. इतकेच नव्हे नंतर या सांध्यामुळे कोणतीही बाधा न होता आयुष्यभर रुग्ण व्यवस्थित चालू-फिरू शकतो, असे डॉक्टरांनी सांगितले.
सुवर्णनगरीला मान
जळगावातील सोने देशभरात प्रसिद्ध असल्याने जळगावात सुवर्ण खरेदीसाठी देशभरातील ग्राहक येत असतात. त्यामुळे जळगावला सुवर्णनगरी म्हणून संबोधले जाते. योगायोगाने या सुवर्ण मुलाम्याच्या सांध्याची पहिली शस्त्रक्रिया सुवर्णनगरी जळगावातच झाली.
पुणे येथील एका ६५ वर्षीय वृद्धाला जळगावात पहिला सुवर्ण मुलाम्याचा सांधा बसविण्यात आला. वॉकरच्या सहाय्याने आलेला हा ६५ वर्षीय रुग्ण हा सांधा बसविल्यानंतर येथून चालत गेला. त्यानंतर आतापर्यंत एकूण १० जणांना या सुवर्ण मुलाम्याच्या सांध्याचे रोपण करण्यात आले असून कोणालाही अॅलर्जी झाली नसल्याची माहिती डॉ. मनीष चौधरी यांनी दिली. धकाधकीचे जीवन व इतर कारणांमुळे गुडघ्याचा त्रास वाढत असताना कृत्रिम सांधेरोपणाच्या शस्त्रक्रियांमध्येही वाढ होत आहे. यात अधिकाधिक प्राधान्य सुवर्ण मुलाम्याच्या सांध्याला दिले जात असल्याचेही डॉ. मनीष चौधरी यांनी सांगितले.
केवळ सुवर्ण मुलामा
हा सांधा सोन्याचा असल्यासारखा दिसत असला तरी तो सोन्याचा नसून त्यावर केवळ मुलामा आहे. या मुलाम्यामुळेच शरीराला कोणतीही बाधा होत नाही, असे सांगण्यात आले.
सुवर्ण मुलाम्याच्या सांध्यामुळे अॅलर्जी होत नाही. या कृत्रिम गुडघ्यास पसंती दिली जात आहे. - डॉ. मनीषचौधरी.