हरिपाठ साधकाला संजीवन समाधी सुख देणारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 01:39 AM2017-11-22T01:39:28+5:302017-11-22T01:39:55+5:30
‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये अभ्यासक प्रा.डॉ.प्रभाकर जोशी यांचा विशेष लेख ‘हरिपाठ : नामभक्तीची संजीवनी’
यादव काळात महाराष्ट्र संस्कृतीची जडण-घडण करण्यासाठी ज्ञानदेवांनी ‘भागवत धर्माची’ उभारणी केली. पंढरपूरचा श्री विठ्ठल हे दैवत मानून अठरा पगडा जातीतील बहुजनांना भक्तीची नवी पाऊलवाट दाखवत नामजपाची सहज सुलभ साधना ज्ञानदेवांनी शिकविली. परमार्थाकडे सामान्य जीवाला वळविणाचा भक्तीमार्गाची पुन:स्थापना ज्ञानदेवांनी केली. त्यासाठी नवविधा भक्तीतील नामभक्तीचा स्वीकार त्यांनी केली. या नामभक्तीत नामदेवादी अठरा पगडा जातीतील संतांनी स्वत:च्या उद्धाराबरोबर इतरही भक्तांचा उद्धार करीत भागवत धर्माची पताका फडकवत ठेवली. ज्ञानदेवांनी या संतमंडळीवर खूप प्रेम केले. त्यांचे हे ‘मातृवत प्रेम’ पाहून सर्व संत मंडळी त्यांचा ‘माऊली’ म्हणून गौरव करताना आजही आषाढी-कार्तिकी महिन्यातील ‘वारक:यां’ची दिंडी विठ्ठलाचा नामगजर करीत पायी वारीच्या माध्यमातून नामभक्तीच्या गजरात न्हाऊन निघतात. आनंद अनुभवतात. हा भक्तीचा सोहळा काय वर्णावा.! वेद व अठरा पुराणे ज्या हरीचे गुणगान करतात तो हरी ‘जीवशिव’ रूपाने सर्वत्र आहे. ख:या भक्ताला श्रद्धेच्या माध्यमातून तो हरीच सर्वत्र असल्याचे प्रत्ययाला या हरिपाठातून येते. हा भूलोक प्रत्यक्ष वैकुंठच होतो. त्यासाठी मुखाने हरीचे गान गा.. जीवाला पुण्य मिळते. द्वारकेचा राजा भगवान श्रीकृष्ण ज्याप्रमाणे पांडवांच्या घरी त्यांचा सांभाळ करण्यासाठी नित्य राहिला त्याप्रमाणे नामभक्तीचा स्वीकार केल्यावर ‘हरी’ तुमचा योगक्षेम वाहण्यासाठी सदैव तुमच्या सान्निध्यात असणार आहे, असे ज्ञानदेव हरिपाठातून हरिभक्ताला समजावून सांगतात. भगवंताला आपले करण्याचे सामथ्र्य या नामभक्तीत आहे. ही जाणीव हरिभक्ताच्या मनात रूजविणारी अद्भुत अशी या हरिपाठांची रचना आहे. हे परब्रrा निगरुण-निराकार आहे. त्रिगुणात्मक प्रकृतीचा आश्रय घेऊन हे परमतत्त्व सगुणाचा आश्रय घेते. सर्व चराचर विश्वाची उत्पत्ती जेथून होते त्या तत्त्वाचे म्हणजे हरीचे भजन करावे, अनंत जन्माची पुण्याई कळल्यानंतर ‘रामकृष्ण मनी रामकृष्ण ध्यानी’ अशी उन्मती स्थिती प्राप्त होते. या जन्मातच ही स्थिती प्राप्त व्हावी म्हणून श्रद्धेने हरिनाम स्मरण करा, असे ज्ञानदेव सांगतात. या नामभक्तीत शुद्धभाव, गुरूकृपा, साधूंची संगती महत्त्वाची असते. भावेविण देव न कळे नि:संदेह! गुरूविण अनुभव कैसा कळे! तपेविणे दैवत दिधल्याविण प्राप्त! गुजेविणे हित कोण सांगे! ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात! साधुचे संगति तरणोपाय! नामभक्ती ही डोळस असावी. तपाशिवाय दैवत प्रसन्न होत नाही. त्यासाठी गुरूकृपा हवी. साधू-संतांचा उपदेश अंगिकारून श्रद्धेने हरिनामाचे उच्चारण केले असता ‘आत्मानुभवांचा’ प्रसाद साधकाला मिळतो. ‘हरी सर्वत्र भरलेला आहे’, असा अनुभव आल्यावर द्वेताचे बंधन तुटून वैष्णवांना नामामृत सहज प्राप्त होते. या नामभक्तीची फलश्रृती ज्ञानदेव पुढील हरीपाठात मांडतात- हरी उच्चारणी अनंत पापराशी! जातील लयासी क्षणमात्रे! तृण अगिAमेळे समरस झाले! तैसे नामे केले जपता हरी! हरी उच्चारण मंत्र हा अगाध! पळे भूतबाधा भेणे याचे! ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ! न करणे अर्थ उपनिषदा! गवताच्या गंजीला अगAीचा स्पर्श झाला म्हणजे सर्व गवत अगAीमध्ये जळून खाक होते, त्याप्रमाणे पापाच्या राशीला हरिनामाचा स्पर्श झाला तर सर्व पापे या हरिनामात जळून भस्म होतात, अशी शक्ती हरिनाम स्मरणात आहे. जीवाची भूतबाधाही ते नष्ट करते. उपनिषदांनाही नामाचे हे सामथ्र्य कळाले नाही, असे हे हरिनाम अलौकिक आहे. निवृत्तीनाथांच्या कृपेने ते मला प्राप्त झाले, असे माऊली नम्रतेने सांगते. माऊलीने आळंदीला वयाच्या एकविसाव्या वर्षी जिवंत समाधि घेतली. कारण मातृत्व आणि वात्सल्य कधीच लयाला जात नाही. ते चिरंतन असते. परमतत्त्वासारखे ! हरिनामाच्या उच्चारणातून हरिमय झालेले आत्मरूप चिरंतनच असते. हा अनुभव माऊलीने प्रत्यक्ष अनुभवला होता. आपल्या या अनुभूतीबद्दल माऊली म्हणते- ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी! धरोनी श्रीहरी जपे सदा! नामभक्तीमुळे या विलक्षण स्थितीचा अनुभव प्राप्त होतो. प्रय}पूर्वक ‘नामजप’ करण्याची क्रिया मौनावते आणि स्वत: श्रीहरी आपल्या अंतरंगात जप करतो व आपण तो ऐकत ऐकत हरिमय होतो. स्वत: माऊलीला हा अनुभव आलेला आहे. हरिपाठातून त्याचे वर्णन येते. गुरू माऊलीच्या कृपेतून प्राप्त झालेला हा हरिपाठ म्हणजे ‘समाधी संजीवन’ आहे. 27 हरिपाठांच्या नित्यपठणातून त्याचा प्रत्यय येतो. जप, तप, कर्म, क्रिया, धर्म आदी उपासनेचे जे अनेक प्रकार आहेत त्यापेक्षा हरिनामाचा जप हा प्रकार साधकाला सहजतेने मोक्ष प्राप्त करून देतो. रामकृष्ण गोविंद हे नाम अत्यंत सोपे आहे. शुद्धमनाने व श्रद्धेने या नामाचा जप केला म्हणजे आत्मदृष्टी उजळून जाते. हे सर्व जग वैकुंठ स्वरूप दिसू लागते. त्यासाठी माऊली सांगते. एक तत्त्वनाम दृढ धरी मना! हरिसी करूणा येईल तुझी! ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद! वाचेसी सद्सद् जपे आधी! नामभक्तीचा स्वीकार करणा:या साधकाजवळ लक्ष्मीवैभव म्हणजे भगवंत सदैव वास करतो. हे नाम ‘गगनाहुनि वाड’ म्हणजे मोठे आहे. त्याचा स्वीकार केला म्हणजे मनुष्य ‘यमाचा पाहुणा होतो. तो जीवाला नरक यातना देत नाही. या हरिनामापुढे मोह निर्माण करणारे विषय लहान होतात. त्यात साधकाचे मन रममाण होत नाही. अनंत जन्मी तप केल्याने जे पुण्य मिळते ते याच जन्मी साधकाला नुसत्या एका हरिनामाच्या स्मरण साधनेने प्राप्त होते. हरिनाम मंत्र हे सामथ्र्यशाली आहे. माऊली म्हणजे अनंत जन्मांचे तप एक नाम! सर्व मार्ग सुगम हरिपाठ! योग याग क्रिया धर्माधर्म माया! गेले ते विलया हरिपाठी! वैष्णवाच्या उद्धारणासाठी नामभक्ती हे साधन सुलभ आहे हरिनामाचे उच्चारण करण्यासाठी काळवेळेचे बंधन नाही. या हरिनामाच्या उच्चारणासाठी देवाने जिव्हा दिली त्या जिव्हेचा उपयोग हरिनाम उच्चारणासाठी जो करतो त्याचे भाग्य मी काय वर्णन करू, असा प्रश्न माऊली उपस्थित करते आणि नामाचे महात्म्य इतके अपूर्व आहे की, नाम उच्चारणारा व ते ऐकणारा ‘हे दोन्ही पक्ष पाही उद्धरती’, असे माऊली हरिपाठातून सांगते. सर्वसुख गोडी साही शास्त्रे निवडी! रिकामा अर्थघडी राहू नको! लटिका व्यवहार सर्व हा संसार! वाया येरझार हरिविण ! निजवृत्ती हे काढी सर्वमाया तोडी! इंद्रिया सवडी लपू नको! तीर्थीव्रती भाव धरी रे करूणा! शांती दया पाहुणा हरि करी! ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीदेवी ज्ञान! समाधी संजीवन हरिपाठ! नामभक्तीचे महत्त्व माऊली या शेवटच्या हरिपाठातून पटवून देते. आजच्या भौतिकवादी जगात मनुष्य आपले आत्मसुख हरवून बसला आहे. अंधश्रद्धा, बुवाबांजी, भक्तीच्या क्षेत्रातील बाजारूपणा, दांभिकता यांच्या प्रभावात सापडलेल्या सामान्य माणसाला ख:या सुखाची ओढ आहे. हे सुख आत्मानंदा आहे. कर्मकांडापेक्षा शुद्धमनाने व श्रद्धेने घेतलेले हरिनामाचे उच्चारण हे सुख सहजतेने प्राप्त करून देते. विठ्ठल नामघोष करीत परमतत्त्वावर भाव ठेवा म्हणजे साधकाच्या ठिकाणी शांती -दया करूणा हे गुण आश्रयाला येतात. सत्पुरूषांचा हा अनुभव आहे. हरिपाठमध्ये हे सामथ्र्य नक्की आहे. कारण माऊलीनेच हरिपाठ हा साधकाला संजीवन समाधी सुख देणारा आहे असे म्हटले आहे. वारकरी पंथातील बहुजन समाजाने हरिपाठाचा स्वीकार केला आहे. नित्यनेमाने ते हरिपाठ म्हणतात. त्यांना त्यातून मिळणारा आनंद अवर्णनीय आहे. कारण ज्ञानदेव माऊंलीचा हा हरिपाठ म्हणजे खरोखरच नामभक्तीची संजीवनी आहे. सर्वानी नियमित म्हटल्यावर त्याचा प्रत्यय नक्की येणार आहे. या संजीवनीचा आपल्या उद्धारणासाठी स्वीकार करू या!