हायटेक चोर होताहेत जळगाव जिल्ह्यातील पोलिसांवर शिरजोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 06:17 PM2017-11-25T18:17:29+5:302017-11-25T18:27:06+5:30
सीसीटीव्ही, मोबाईलसह माहिती तंत्रज्ञानाच्या साहित्याबाबत चोरटे घेताहेत काळजी
विलास बारी /आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.२५ : जिल्हाभरात चोरी, घरफोडी आणि दरोड्याच्या घटना आता नित्याच्या झाल्या आहेत. गुन्हेगारी टोळ्यांची गुन्ह्याची पद्धत आणि माहिती आणि तंत्रज्ञानाबाबत चोरट्यांकडून घेण्यात येणारी खबरदारी यामुळे चोरटे पोलिसांवर शिरजोर होऊ पाहत आहेत. चोरांवर मोर होण्यासाठी पोलिसांना देखील हायटेक तंत्रज्ञान अवगत करावे लागणार आहे. गुन्हेगारी टोळीची गुन्हा करण्याच्या पद्धतीवर संशोधन गरजेचे असताना कारागृहातून सुटणाºया गुन्हेगारांवर पोलिसांचा ‘वॉच’ महत्त्वाचा आहे.
माहिती तंत्रज्ञानामुळे पोलीस तपासाला मदत
पूर्वी एखाद्याकडे मोबाईल असणे हे श्रीमंतीचे लक्षण मानले जात होते. त्यामुळे चोरी, घरफोडी किंवा दरोड्याच्या घटनेत गुन्हेगारांकडून हमखास मोबाईल, टी.व्ही, संगणक या वस्तू लांबविल्या जात होत्या. मात्र या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये असलेल्या सिक्रेट कोडच्या माध्यमातून पोलीस गुन्हेगारांपर्यंत सहज पोहचू लागले. पुढे ही बाब ज्यावेळी गुन्हेगारी टोळ्यांच्या लक्षात येवू लागली त्यावेळी चोरट्यांनी मोबाईल किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू सोबत नेणे टाळायला सुरुवात केली. घटनेवेळी कोणताही पुरावा नसल्याने आणि केवळ शक्यतांवर आधारित तपास होत असल्याने पुढे हे गुन्हेगार सबळ पुराव्या अभावी निर्दोष सुटू लागले.
मुंबईतील व्यापाऱ्याच्या हत्येवेळी पहिल्यांदा मोबाईल तंत्रज्ञानाचा वापर
मुंबईतील एका बड्या व्यापाऱ्याची माफिया जगतातील हस्तकांकडून हत्या करण्यात आली. या हत्येच्या वेळी पहिल्यांदा मुंबई पोलिसांनी माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर केला. या गुन्ह्यातील आरोपीचे मोबाईल लोकेशन निष्पन्न करीत आरोपीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर या तंत्रज्ञानाचा वापर वाढवा व गुन्हे तपास व्हावा यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर गुन्हे शाखेच्या अंतर्गत संगणक शाखा कार्यान्वित करण्यात आली.
गुन्हा करण्यापूर्वीच निर्दोष होण्याची खबरदारी
अनेक गुन्ह्यांमध्ये चोरटे, दरोडेखोर हे तोंडावर कापड बांधून घरफोडी किंवा दरोडा टाकत असतात. शनिवारी पहाटे पारोळा रस्त्यावरील अंबिका दूध डेअरीतील १६ लाख २७ हजारांची रक्कम लांबविणाऱ्या चोरट्याने देखील हीच युक्ती अवलंबिली. यात आपली ओळख लक्षात येवू नये हाच गुन्हेगाराचा हेतू असतो. त्यातच पोलिसांनी पकडले तर ओळख निष्पन्न होत नसल्याने संशयाचा फायदा म्हणून तो आरोपी निर्दोष मुक्त होत असते. टी.व्ही.वरील गुन्हे कथांच्या माध्यमातून दाखविण्यात येणाºया मालिकांमधून गुन्हेगार हे अधिक सावध होत आहेत.
गुन्हेगारी टोळ्यांच्या गुन्हे पद्धतीच्या संशोधनाची गरज
चंगळवादी जीवनशैली, गरीबी आणि दारिद्रय यामुळे रोज नवनवीन गुन्हेगारी टोळ्या निर्माण होत आहेत. दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचा आणि आर्थिकस्तर चांगला असल्याने जळगाव जिल्ह्यात चोरी आणि घरफोडींच्या घटना जास्त होत असतात.मध्यप्रदेश, गुजराथ या राज्यासह अन्य जिल्ह्यातील गुन्हेगार हे जळगावात उपद्रव निर्माण करीत असतात. पावरा टोळी, फासे-पारधी टोळी, सिकलकर टोळी, गॅसकटर टोळी, झाबुआ टोळी यांच्यासह स्थानिक गुन्हेगारांवर लक्ष केंद्रीत करून त्यांच्याकडून करण्यात येणाऱ्या गुन्ह्याच्या पद्धतीचे संशोधन करण्याची गरज आहे. यासोबतच कारागृहातून सुटून आलेले गुन्हेगार व त्याठिकाणी त्यांच्या संपर्कातील गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करण्याची गरज आहे. पोलीस गुन्हेगारांच्या एक पाऊल पुढे राहिले तरचं गुन्हेगारी कमी करण्यात पोलिसांना यश येणार आहे.