हिंगोणेकरांना २६/११ च्या हल्ल्यातील शहीद मुरलीधर चौधरी यांच्या स्मारकाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 04:55 PM2017-11-25T16:55:14+5:302017-11-25T17:00:32+5:30
शहीद मुरलीधर लक्ष्मण चौधरी यांच्या स्मारकाची हिंगोणेकरांना नऊ वर्षानंतर आजही प्रतीक्षा
आॅनलाईन लोकमत
हिंगोणे, ता.यावल,दि.: मुंबईत झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद व येथील रहिवासी मुरलीधर लक्ष्मण चौधरी यांच्या स्मारकाची हिंगोणेकरांना नऊ वर्षानंतर आजही प्रतीक्षा आहे. दहशतवादी हल्ल्याला नऊ वर्ष होऊनही शहीद चौधरी यांचे स्मारक उभे राहात नसल्याने नाराजी आहे.
शहीद चौधरी यांचे गावात स्मारक उभारण्यासाठी समितीदेखील गठीत करण्यात आली होती. मात्र केवळ कागदी घोडे नाचविण्यात समितीचा वेळ गेला. शासनाच्या क्लिष्ट आणि जाचक अटींमुळे व उदासीन लोकप्रतिनिधींमुळे स्मारकाचा विषय आजतागायत प्रलंबित पडला आहे. याला जबाबदार कोण शासन, प्रशासन, समिती, ग्रामपंचायत का लोकप्रतिनिधी असा प्रश्न सुज्ञ नागरीकांना पडला आहे.
हिंगोणे गावात स्मारकाची उभारणी केल्यास आजचा तरुणांना त्यांच्या स्मारकापासून स्फूर्ती मिळेल. त्यासाठी स्मारकाची उभारणी गरजेचे आहे. ग्रामपंचायत व समितीने यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.