भुसावळात पाऊस नसताना ६१ टक्के नजर पैसेवारी कशी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 05:47 PM2018-09-20T17:47:59+5:302018-09-20T17:49:46+5:30
भुसावळ तालुक्यात चार महिन्यात २४ दिवस तोही अल्पसा पाऊस झाला. शासकीय यंत्रणेच्या आधारे ४९ टक्के पाऊस पडला असल्याची नोंद आहे.
भुसावळ : तालुक्यात चार महिन्यात २४ दिवस तोही अल्पसा पाऊस झाला. शासकीय यंत्रणेच्या आधारे ४९ टक्के पाऊस पडला असल्याची नोंद आहे. प्रत्यक्षात ३५ टक्केसुद्धा पाऊस पडला नसताना ६१ टक्के नजर पैसेवारी लागली कशी, असा प्रश्न उपस्थित करून आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले. आजच जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांची भेट घेऊन त्यांना ही परिस्थिती सांगणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
‘लोकमत’ने दुष्काळासंदर्भात मुद्देसूद बातमी सोमवारी प्रसिद्ध केलीे होती. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली होती. निवेदन देतेवेळी जि.प. सदस्या पल्लवी सावकारे, पं.स. सभापती प्रीती पाटील, माजी सभापती सुनील महाजन, उपसभापती वंदना उन्हाळे, जि.प. माजी सदस्य समाधान पवार, साकेगावचे सरपंच संजय पाटील, अनिल पाटील, खडक्याचे भैया महाजन उपस्थित होते. पाऊस नसल्याने मोंढाळा, महादेव तांडा, खंडाळा, शिंदी, कन्हाळा आदी गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट आहे. गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणार आहे.
भविष्यात चाराटंचाईचे संकट उभे राहणार आहे. तरीही महसूल विभागाकडून ६१ टक्के पैसेवारी लावण्याचा जावईशोध कसा करण्यात आला, असा प्रश्न उपस्थित झाला. कुºहे (पानाचे) येथील सरपंच रामलाल बडगुजर, खडका सरपंच पद्माबाई प्रतापसिंग पाटील, वांजोळा येथील सरपंच नरेंद्र पाटील, कन्हाळे येथील सरपंच राजेंद्र पाटील, खंडाळा येथील सरपंच वैशाली पाटील, मोंढाळा येथील सरपंच जगन्नाथ कोळी, कुºहे (पानाचे) येथील उपसरपंच वासुदेव वराडे, सदस्य नाना पवार, नारायण कोळी, वेल्हाळा सरपंच विजय पाटील, किन्ही सरपंच हर्षा येवले, सुनसगावचे दीपक सावकारे, भालचंद्र पाटील, जोगलखेड्याचे सरपंच पंकज पाटील, कठोरा सरपंच प्रशांत पाटील, साकेगावचे माणिक पाटील, हातनूर सरपंच नीता इंगळे, शिंदी येथील देवसिंह राजपूत, पिंपळगाव बुद्रूकचे निवृत्ती पाटील, बेलव्हाय सरपंच मनीषा खाचणे, पिंपळगाव बुद्रूकचे बाबूराव सरोदे, मन्यारखेडा येथील शशिकांत पाटील, वझरखेडा येथील किरण पाटील, खडका येथील अनिल महाजन, साकरी येथील किरण चोपडे, वांजोळा उपसरपंच देवीदास सावळे उपस्थित होते.