जळगावात पोलिसांना दिली खूनाची माहिती; आढळला जखमी मद्यपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 12:47 PM2017-12-04T12:47:50+5:302017-12-04T12:50:16+5:30
स्थळ.... एमआयडीसी पोलीस स्टेशन.. वेळ दुपारी दोन वाजेची.. घाबरलेल्या अवस्थेत दोन जण येतात.... साहेब आमचा एका जणाशी वाद झाला.. त्याला आम्ही दगडाने ठेचून मारले आहे... तुम्ही तातडीने तेथे पोहचा.. हे शब्द ऐकून ठाणे अमलदाराने खुर्चीच सोडली... तातडीने पोलीस निरीक्षकांना माहिती दिली. निरीक्षकांनीही क्षणाचा विलंब न करता या दोघांना सोबत घेत घटनास्थळ गाठले...मात्र तेथे एक जण पडलेला आढळला... समोर पोलीस पाहून तो ताडकन उभा राहिला... त्याला सुस्थितीत पाहताच पोलीसही अवाक् झाले... एका बाजूने तिव्र संताप तर दुस-या बाजूने सुटकेचा नि:श्वास अशी स्थिती पोलिसांची झाली...दारूच्या नशेत खोटी माहिती देत पोलीस यंत्रणेला वेठीस धरणे या तिघांच्या अंगाशी आले. या तिघांना पोलिसांनी खाकी हिसका दाखवत कोठडीत टाकले.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,४: स्थळ.... एमआयडीसी पोलीस स्टेशन.. वेळ दुपारी दोन वाजेची.. घाबरलेल्या अवस्थेत दोन जण येतात.... साहेब आमचा एका जणाशी वाद झाला.. त्याला आम्ही दगडाने ठेचून मारले आहे... तुम्ही तातडीने तेथे पोहचा.. हे शब्द ऐकून ठाणे अमलदाराने खुर्चीच सोडली... तातडीने पोलीस निरीक्षकांना माहिती दिली. निरीक्षकांनीही क्षणाचा विलंब न करता या दोघांना सोबत घेत घटनास्थळ गाठले...मात्र तेथे एक जण पडलेला आढळला... समोर पोलीस पाहून तो ताडकन उभा राहिला... त्याला सुस्थितीत पाहताच पोलीसही अवाक् झाले... एका बाजूने तिव्र संताप तर दुस-या बाजूने सुटकेचा नि:श्वास अशी स्थिती पोलिसांची झाली...दारूच्या नशेत खोटी माहिती देत पोलीस यंत्रणेला वेठीस धरणे या तिघांच्या अंगाशी आले. या तिघांना पोलिसांनी खाकी हिसका दाखवत कोठडीत टाकले.
मिळालेली माहिती अशी की, रामराजी प्रेमलाल महतो (वय २२ रा.गोरहाटी, दरंभगा, बिहार), हेमंत मोतीलाल पाटील (वय २६, रा. अमळनेर, ह.मु.उमाळा, ता.जळगाव) व स्वप्नील श्रीधरराव ठाकरे (वय २२ रा. मंगरुळ जि.अमरावती) हे तिन्ही जण रविवारी मद्याच्या नशेत होते. त्यांच्यात किरकोळ कारणावरुन दुपारी वाद झाला होता. त्यात हेमंत व स्वप्नील या दोघांनी रामराजीला चिंचोली जंगलात झिंगी टेकडीवर मारहाण केली. डोक्यात दगड लागल्याने मद्याच्या नशेत तर्रर असलेला रामराजी जागेवरच झोपला. डोक्याजवळ खरचटल्याने रक्त निघायला लागले. या झटापटीत रामराजी मरण पावला असा समज या दोघांचा झाला. आता आपले खरे नाही, असे समजून त्यांनी स्वत:च्या बचावासाठी थेट एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठले व घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली.
अन् पोलिसांचा ताफा घटनास्थळाकडे...
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक अनिरुध्द अढाव यांनी पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे व उपअधीक्षक सचिन सांगळे यांना घटनेची माहिती देत आम्ही घटनास्थळाकडे रवाना होत असल्याची माहिती दिली. त्यानुसार उपनिरीक्षक एन.बी.सूर्यवंशी, रामकृष्ण पाटील, गोविंदा पाटील, दीपक चौधरी आदी जणांसह त्या दोघांना सोबत घेत चिंचोली व उमाळ्या दरम्यान असलेल्या जंगलातील घटनास्थळ गाठले. तेथे पाहणी केली असता खरोखर एक जण निपचित अवस्थेत पडलेला होता. पोलिसांनी त्याला हात लावून हलविले असता पोलीस पाहताच तो ताडकन उभा राहिला.
या तिघांनी मद्याच्या नशेत आपसात वाद केला व त्यात पोलीस यंत्रणेला वेठीस धरल्याने निरीक्षक अढाव यांनी तिघांना तेथूनच पोलीस ठाण्यात आणले. खाकीचा हिसका दाखविल्यानंतर त्यांची मद्याची नशा उतरली. जखमीच्या तोंडावर पाणी मारुन त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार केल्यानंतर सायंकाळी पाच वाजता त्याला पुन्हा पोलीस ठाण्यात आणण्यात आले.या तिघांवर कलम १६० नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली.
रामराजे महतो हा सुरत येथून रेल्वेने सकाळी जळगावात आला तर हेमंत व स्वप्नील हे दोन्ही जणही त्याच रेल्वेने नंदूरबार येथून आले. रेल्वे स्टेशन परिसरात एका दारुच्या दुकानावर रामराजे याची या दोघांशी ओळख झाली. तेथेच मनसोक्त दारु प्यायल्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. हेमंत व स्वप्नील या दोघांनी रामराजे याला फ्रेश होण्यासाठी घरी येण्यासाठी आग्रह केला. दारुच्या नशेत तर्रर असल्याने तो लागलीच तयार होऊन या दोघांसोबत उमाळा येथे गेला. तेथे अंघोळ केल्यानंतर पुन्हा तिन्ही जण गावाच्या बाहेर निघाले. तेथे तिघांनी गावात गावठी दारु घेतली.प्रमाणाच्या बाहेर दारु रिचवल्यामुळे नशेतच या तिघांमध्ये वाद झाला. चिंचोली गावाजवळ त्यांनी वाद केला. जंगलात गेल्यानंतर हेमंत व स्वप्नील या दोघांनी रामराजी याला बेदम मारहाण केली. त्यामुळे तो जागेवरच बेशुध्द पडला.