जळगावातील कारागृहातील आरोपी पलायन प्रकरणाची होणार विभागीय चौकशी - कारागृह उप महानिरीक्षकांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 12:43 PM2018-12-06T12:43:19+5:302018-12-06T12:43:52+5:30
स्वयंपाकाची तयारी करताना कारागृहातून पळाले दोन आरोपी
जळगाव : कारागृहात कैद्यांसाठी स्वयंपाकाची तयारी करीत असताना भिस्ती अमलदार दूध घ्यायला गेल्याची संधी साधत रवींद्र भीमा मोरे (वय २७, रा.बोदवड) व शेषराव सुभाष सोनवणे (वय २८, रा.बिलवाडी, ता.जामनेर) या दोन आरोपींनी १७ फूट उंच भिंतीवरुन उडी घेऊन कारागृहातून पलायन केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी सहा वाजता घडली होती. या प्रकरणाची विभागीय चौकशी होणार असल्याची माहिती कारागृह उप महानिरीक्षक योगेश देसाई यांनी जळगावात दिली.
रवींद्र मोरे व शेषराव सोनवणे यांना पिंपळगाव हरेश्वरला दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यात ३० आॅगस्ट २०१८ रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर ४ सप्टेबर रोजी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. या दोन्ही आरोपींना बॅरेल क्र.५ मध्ये ठेवण्यात आले होते. दोघांना स्वयंपाक बनविता येत असल्याने त्यांना स्वयंपाक करणाऱ्या आरोपींच्या स्वतंत्र बॅरलमध्ये (भिस्ती) ठेवण्यात आले होते.
दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार
कारागृहातून पलायन केलेला रवींद्र मोरे व शेषराव सोनवणे हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. आॅगस्ट महिन्यात पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी या दोघांना बियाणे व खतांचे दुकान फोडल्याच्या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली होती. सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास होता. या दोन्ही जणांनी मालेगाव, पाचोरा, जालना, औरंगाबाद व जळगाव शहरात चोºया व घरफोड्या केलेल्या आहेत.
यापूर्वीही केले होते एका आरोपीने पलायन
दीड वर्षापूर्वी कारागृहातून १५ फूट उंच भींतीवरुन उडी घेऊन सदा उर्फ सुधाकर मधुकर पवार उर्फ बंदर (रा.बोदवड) या आरोपीने पलायन केले होते. गोदामातून टायर चोरीच्या केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला अटक केली होती.
या घटनेनंतर कारागृहाच्या भींतीची उंची वाढविण्यात आली होती. त्यानंतरही बुधवारी दोन आरोपींनी पलायन केले.