चाळीसगाव तालुक्यातील उपखेड येथे बिबट्याचा महिलेवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 05:04 PM2017-12-06T17:04:19+5:302017-12-06T17:09:17+5:30
कापूस वेचत असताना दुपारी साडे तीन वाजता केला हल्ला
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.६ : चाळीसगाव तालुक्यातील उपखेड शिवारातील एका शेतात कापूस वेचत असताना बिबट्याने गायत्री सुरेश पाटील (३८) या महिलेवर बुधवारी दुपारी साडेतीन वाजता हल्ला केला. जखमी महिला व पुरुषांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने पळ काढला. या महिलेला उपचारासाठी चाळीसगाव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चाळीसगाव तालुक्यातील उपखेड शिवारात विश्वास त्र्यंबक पाटील यांचे शेत आहे. पाटील यांच्या सून गायत्री पाटील या शेतात कापूस वेचत होत्या. या दरम्यान दुपारी साडे तीन वाजता बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. बिबट्याने समोरून हल्ला केल्याने मानेवर जखम झाली आहे. सोबत असलेल्या महिलांनी व शेतातील पुरुषांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर उपस्थितांनी जखमी गायत्री पाटील यांना उपचारासाठी चाळीसगाव रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी तत्काळ उपचार सुरु केले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांची शेताकडे धाव घेतली.