शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 07:47 AM2024-05-04T07:47:22+5:302024-05-04T07:47:50+5:30

रोजगार देऊ म्हणणारे आता कुठे आहेत?

lok sabha election 2024 Misuse of power by center continues when farmers are in crisis Criticism of Sharad Pawar | शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका

शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका

चोपडा/ भुसावळ (जि. जळगाव) :  गेल्या दहा वर्षांत इंधनाचे भाव कमी होण्याऐवजी वाढतच  आहेत. शेतीमालाला भाव नाही, शेतकरी आत्महत्या थांबायला तयार नाहीत.  दरवर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार देऊ म्हणणारे आज त्या विषयावर बोलत नाहीत. सत्ता लोकांच्या भल्यासाठी वापरायची असते.  मात्र, केंद्र सरकारकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे, अशी टीका राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते शरद पवार  यांनी चोपडा येथे आयोजित सभेत केली.

 पवार म्हणाले की,  हमीभाव मिळावा म्हणून दिल्लीत शेतकऱ्यांनी आंदोलन केले.  वर्षभर ते आंदोलन चालले.  मात्र, तिथे जायला सत्ताधाऱ्यांना वेळ मिळाला नाही. उलट शेतकऱ्यांवर गोळ्या चालवल्या गेल्या. आंदोलनात ७०० शेतकऱ्यांनी आपले जीव गमावले; पण, सरकारला काहीही फरक पडला नाही. शेतीप्रधान देशात शेतकऱ्यांची अशी अवस्था ही देशासाठी चांगली बाब नक्कीच नाही. 

भुसावळ येथे संतोषी माता सभागृहातही सभा झाली. तेथे शरद पवार म्हणाले, महागाईचे मुद्दे सोडून भाजप समाजात तेढ निर्माण करीत आहे.  जनतेला आता बदल हवा आहे. शासकीय यंत्रणेचा गैरवापर सुरू आहे. देशात जे काही सुरू आहे ती लोकशाही महाराष्ट्राला मान्य नाही.

सरकारवर टीका केल्यास तुरुंगवास : पवार

या देशांमध्ये लोकशाही आहे, दिलेल्या अधिकारातून सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे.  मात्र केंद्र सरकारवर टीका केल्यास तुम्हाला तुरुंगवास भोगावा लागतो, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल असल्याचे पवार म्हणाले.

केंद्र सरकारच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात अनेक तरुण बेरोजगार झाले, महागाई वाढली, याबद्दल कोणीही काही बोलत नाही किंवा जनतेची दिशाभूल करून हे सरकार लोकांना संभ्रमात टाकून शासन चालवत आहे. देशाची लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर  भाजपला देशातून हद्दपार करावेच लागेल, असेही पवार भुसावळमध्ये म्हणाले.

Web Title: lok sabha election 2024 Misuse of power by center continues when farmers are in crisis Criticism of Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.