प्रतिभाताई पाटील यांचे जीवन कार्यही आता ब्रेल लिपीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 12:43 PM2018-01-07T12:43:45+5:302018-01-07T14:30:38+5:30
चाळीसगाव यथील अंधशाळेतील शिक्षकाने तयार केला सहावा ब्रेल कोलाज
चुडामण बोरसे / ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 07- माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा जीवन कार्याची प्रज्ञाचक्षू विद्याथ्र्यानाही माहिती व्हावी, यासाठी ‘राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील की जीवनी’ हा हिंदी ब्रेल रुपांतरित कोलाज तयार करण्यात आला आहे. चाळीसगावच्या राष्ट्रीय अंधशाळेतील विशेष शिक्षक सचिन यशवंतराव सोनवणे यांनी दीड महिन्याच्या अथक परिश्रमानंतर या कोलाजची निर्मिती केली आहे. ब्रेेल लिपीत तयार केलेला त्यांचा हा सहावा कोलाज आहे.
प्रतिभाताई पाटील यांचे प्राथमिक शिक्षण चाळीसगाव येथे झाले आहे. आमदार ते राष्ट्रपती असा त्यांचा थक्क करणारा प्रवास आहे. त्यांचे बालपण, महाविद्यालयीन जीवन आणि राजकीय कार्यकाळाची माहिती संकलित करण्यात आली. त्यानंतर या माहितीचे ब्रेल लेखन पाटीवर कोलाज तयार करण्यात आले.
यासाठी शिक्षक सोनवणे यांनी तब्बल दीड महिना कठोर मेहनत घेतली. यानंतर पुण्यातील सामाजिक कार्यकत्र्या राखी रासकर यांच्याशी संपर्क साधून प्रतिभाताईंर्पयत या कोलाजची माहिती पोहचवली. याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनीही या ब्रेेल कोलाजचे प्रकाशन करण्यास संमती दिली.
25 डिसेंबर रोजी झालेल्या ब्रेल कोलाजच्या प्रकाशनला आमदार मोहन जोशी, राखी रासकर, निवेदिका मेघना झुझम, गजश्री सोनवणे उपस्थित होते.
ब्रेल कोलाज हे प्रज्ञाचक्षू तरुण- तरुणींच्या जीवनात प्रकाश आणण्याचे कार्य करेल आणि या उपक्रमाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जावी, अशी अपेक्षा प्रतिभाताई पाटील यांनी मनोगतात व्यक्त केली.
प्रतिभाताई यांच्या राजकीय जीवनाला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ‘मातृतुल्य आदरणीय प्रतिभाई’ हे कवितारुपी मानपत्र सचिन यांच्या पत्नी गजश्री सोनवणे यांनी सादर केले.
सचिन सोनवणे यांनी आतार्पयत पु.ल. देशपांडे लिखित ‘बटाटय़ाची चाळ‘, तिरुपती दर्शन - हिस्ट्री व अल्बम, बहिणाबाईंची जीवन कहाणी, अब्राहम लिंकनचे मुख्याध्यापकास पत्र आणि कुसुमाग्रजांची ‘कणा’ आणि ‘जालियनवाला बाग’ या कवितेचाही ब्रेल लिपित कोलाज केला आहे.
प्रतिभाताईंनी वेगळा इतिहास घडविला आहे. त्यांची माहिती प्रज्ञाचक्षू विद्याथ्र्याना कळावी, हा दृष्टीकोन समोर ठेवून प्रतिभाताई पाटील की जीवनी हा हिंदी ब्रेल रुपांतरित कोलाज तयार केला आहे.
- सचिन सोनवणे, शिक्षक, चाळीसगाव जि. जळगाव.