भुसावळातील सांडपाणी प्रक्रियेसाठी केंद्राकडे प्रस्ताव

By Admin | Published: June 8, 2017 04:56 PM2017-06-08T16:56:38+5:302017-06-08T16:56:38+5:30

35 एमएलडी पाण्याचा पुनर्वापर : दीपनगर वीज केंद्राला देणार पाणी

Proposal to the center for sewage treatment | भुसावळातील सांडपाणी प्रक्रियेसाठी केंद्राकडे प्रस्ताव

भुसावळातील सांडपाणी प्रक्रियेसाठी केंद्राकडे प्रस्ताव

googlenewsNext

 ऑनलाईन लोकमत विशेष/पंढरीनाथ गवळी

भुसावळ, दि.8 - भुसावळ शहरातील तब्बल  35 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्याचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून प्रस्ताव तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती नगराध्यक्ष रमण भोळे यांनी ‘लोकमत’ ला दिली. प्रस्ताव तयार झाल्यानंतर तो तातडीने केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
वीज निर्मितीसाठी पाण्याचा वापर
पालिकेच्या या सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पातील पाण्यावर वीज निर्मिती करणे शक्य असल्याने भुसावळ पालिका या सांडपाणी प्रकल्पात प्रक्रिया केलेले पाणी शहराजवळील महाजनकोच्या दीपनगर येथील वीज निर्मिती केंद्राला विकत देणार आहे. त्यामुळे वीज निर्मितीसाठी तापीनदीतून जे पाणी उचलले जात आहे त्याची बचत होईल. यामुळे पालिकेला कायम स्वरुपी चांगले उत्पन्न मिळेल  व  पालिकेची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होईल.
दरम्यान, सांडपाण्यावर प्रक्रिया झालेले पाणी दीपनगर प्रशासनाला वीज निर्मितीसाठी दिल्यानंतर दीपनगरातील शुद्ध पाणी भुसावळकरांना देण्याचेही नियोजन आहे.
शहरातून रोज निघणारे सुमारे 35 एमएलडी सांडपाणी शहराजवळील तापीनदीत जाते. त्यामुळे तापीनदीतील पाणी अशुद्ध होते. शहरातील सांडपाणी तापीनदीत न सोडता ते एका ठिकाणी गोळा करुन त्यावर प्रक्रिया करण्यासाठी सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प पालिका सुरू करणार आहे, त्या दृष्टीने नियोजन केले जात आहे, असेही  रमण भोळे म्हणाले.
अमृत योजनेत समावेश
केंद्र सरकारच्या अमृत योजनेत पालिकेचा समावेश आहे. अमृत योजनेतूनच सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारणीसाठी प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
कंडारी गावाचाही समावेश
भुसावळ शहराजवळील कंडारी या सुमारे 20 हजार लोकसंख्येच्या गावातील सांडपाण्यावर देखील भविष्यात पालिका प्रक्रिया करुन त्या पाण्याचा पुनर्वापर करेल. कंडारी व परीसरातील सांडपाणी नदी पात्रात जावू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष रमण भोळे यांनी ‘लोकमत’ला दिली. यामुळे कंडारी ग्रा.पं.ला उत्पन्न मिळेल.
सांडपाण्यावर वीज निर्मिती
भुसावळ शहरातून तापीनदीत जाणारे 35 एमएलडी सांडपाणी तापीनदी काठावर एका ठराविक जागी साठवून त्यावर प्रक्रिया केली जाईल. या प्रकल्पातून निघणारे पाणी पाईप लाईनद्वारे येथून पाच कि.मी.अंतरावरील दीपनगर येथील वीज निर्मिती केंद्राला ते विकण्यात येईल. त्यातून भुसावळ पालिकेला उत्पन्न मिळेल.
अमृत योजनेची देण
भुसावळ पालिकेचा केंद्र सरकारच्या अमृत योजनेत समावेश झाली बाब शहरवासीयांसाठी आनंदाची आहे. याच योजनेतून शहरातील सांडपाण्यावर (रिसायकलिंग) प्रक्रिया करुन त्याचा वीज निर्मितीसारख्या कार्यासाठी वापर करणे ही भूषणावह बाब ठरणार आहे. असा प्रकल्प नागपूर महापालिका राबवित आहे. त्यातून त्यांचे उत्पन्न वाढले आहे.
मॉडेल प्रकल्प..
भुसावळ पालिकेचा हा सांडपाणी शुद्धीकरण पुनर्वापर  प्रकल्प नाशिक महसूल विभागासह राज्यात आदर्श (मॉडेल प्रोजेक्ट) प्रकल्प राहील. यासाठी आतापासूनच आमचे नियोजन सुरू आहे. तज्ज्ञांची टीम कामाला लागली आहे. तांत्रिक बाबींसह प्रस्ताव तयार केला जात आहे, असे भोळे म्हणाले.
दोन लाख नागरिकांना विम्याचे कवच
भुसावळ पालिका शहरात विविध विकासाचे प्रकल्प राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून रेल्वे, फॅक्टरी आणि वीज कामगारांचे शहर म्हणून ओळख असलेल्या या शहरातील प्रत्येक रहिवाशाला पालिकेकडून विम्याचे कवच दिले जाणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष रमण भोळे यांनी ‘लोकमत’ला दिली.
भुसावळ शहराची सुमारे दोन लाख इतकी लोकसंख्या आहे. या दोन लाख लोकांना विम्याचे संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक नागरीकाला पालिका दोन लाख रुपयांचे विमा कवच देईल. कोणावर दु:खद प्रसंग ओढवला तर अशा व्यक्तीला त्याचा फायदा होईल.

Web Title: Proposal to the center for sewage treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.