सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शेतकरी संकटात - शरद पवार यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 01:04 PM2018-09-16T13:04:31+5:302018-09-16T13:04:51+5:30
जळगाव जिल्ह्यातील नेरी येथे अमृतराव पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
जळगाव / जामनेर/नेरी, जि. जळगाव : देशातील ८० टक्के लोक शेती करतात, त्यातील ६० टक्के शेती निसर्गावर अवलंबून आहे. सत्ताधाºयांनी शेतकºयांच्या समस्यांकडे पुरेसे लक्ष न दिल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. कर्जमाफीचा लाभ अजूनही शेवटच्या शेतकºयास मिळालेला नाही ही दुदैर्वी बाब असल्याचे प्रतिपादन माजी कृषीमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी सकाळी नेरी, ता.जामनेर येथील कार्यक्रमात केले.
नेरी येथील ज्येष्ठ समाजवादी नेते, स्व. अमृतराव चिंधूजी पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण पवार यांनी केले. ते पुढे म्हणाले की, १९८० मध्ये शेतकºयाच्या प्रश्नावर सत्ताधाºयांचे लक्ष वेधण्यासाठी जळगावाहून नागपूरला पायी दिंडी काढली होती. नेरी मुक्कामी अमृतदादांनी स्वागताबरोबरच शेतकºयासोबत दिंडीत सहभाग घेतला. सहकार, शिक्षण क्षेत्रात पाटील यांचे जिल्ह्यात मोठे योगदान होते.
या जिल्ह्यात पूर्वी प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते होते. सध्या जिल्ह्याचे राजकारण पैशाच्या जोरावर चालले असल्याचे समजले. निवडुन आलेल्या लोकप्रतिनिधींच्या खरेदी विक्रीचा बाजार येथे सुरु असल्याचे सांगून पवार म्हणाले, नवीन पिढीला प्रामानिक राजकारणाची सुरुवात करावी लागेल.
पवार यांनी भाषणात स्व.प्रल्हादराव पाटील, स्व.गजाननराव गरुड, स्व. ब्रिजलाल पाटील, माजी आमदार गुलाबराव पाटील आदींचा उल्लेख केला.
विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, संजय गरुड यांची भाषणे झाली. नेरी शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रमोद पाटील यांनी प्रास्ताविक केले. संभाजी पाटील यांनी आभार मानले.