धुळे जिल्हा ठरतोय राजकीय प्रयोगशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 01:00 PM2019-03-03T13:00:24+5:302019-03-03T13:03:50+5:30

धुळे, नंदुरबारवर राजकीय पक्षांचे लक्ष केंद्रित ; पंतप्रधान मोदी यांच्या सभेला राहुल गांधी यांच्या सभेद्वारे प्रत्युत्तर भाजपाकडून जळगाव तर राष्टÑवादीकडून रावेर मतदारसंघासाठी अद्यापही चाचपणी; उलथापालथीची दाट शक्यता

State laboratories due to Dhule District | धुळे जिल्हा ठरतोय राजकीय प्रयोगशाळा

धुळे जिल्हा ठरतोय राजकीय प्रयोगशाळा

googlenewsNext

मिलिंद कुलकर्णी
खान्देशातील जळगाव, रावेर, धुळे आणि नंदुरबार या लोकसभेच्या चार जागा सद्यस्थितीत भाजपाकडे आहेत. २०१४ च्या लाटेचा परिणाम आणि डॉ.विजयकुमार गावीत यांची कन्या डॉ.हिना या भाजपाच्या उमेदवार असल्याने नंदुरबार हा काँग्रेसचा अजेय असलेला मतदारसंघदेखील भाजपाने काबीज केला. धुळ्यात रामदास गावीत, प्रतापराव सोनवणे यांच्यारुपाने भाजपाने यापूर्वी तेथे पाय रोवलेले आहेत. त्यामुळे डॉ.सुभाष भामरे यांच्या विजयाचे आश्चर्य वाटले नाही. जळगाव जिल्हा तर भाजपाचा बालेकिल्ला आहे. ही राजकीय परिस्थिती पाहता काँग्रेस आघाडीला नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याकडून मोठी अपेक्षा आहे. माणिकराव गावीत, सुरुपसिंग नाईक, चंद्रकांत रघुवंशी, दीपक पाटील, पद्माकर वळवी, के.सी.पाडवी हे नंदुरबारातील तर रोहिदास पाटील, अमरीषभाई पटेल, डॉ.हेमंत देशमुख, राजवर्धन कदमबांडे, डी.एस.अहिरे, शिवाजीराव दहिते ही धुळे जिल्ह्यातील मातब्बर आणि प्रभावशाली नेते मंडळी दोन्ही काँग्रेसकडे आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था, सहकार क्षेत्र, शिक्षणसंस्था ही शक्तिस्थाने आघाडीच्या नेत्यांकडे आहेत. त्यामुळे एकसंघपणे या निवडणुका लढल्यास यश मिळू शकते, या ईर्षेने प्रयत्न सुरु झाले आहेत. राहुल गांधी यांची महाराष्टÑातील पहिली प्रचार सभा धुळ्यात घेण्याचे प्रयोजन हे आहे.
भाजपाच्यादृष्टीने नंदुरबार आणि धुळे हा मतदारसंघ आता प्रतिष्ठेचा बनलेला आहे. धुळे महापालिकेत अलिकडे मिळविलेल्या विजयामुळे डॉ.सुभाष भामरे, जयकुमार रावल यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा घेऊन त्यांनी या जागेचे महत्त्व जनता आणि कार्यकर्त्यांमध्ये बिंबविले आहे. धुळे-मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग, सुलवाडे-जामफळ योजनांचा शुभारंभ हा त्यांच्यादृष्टीने मैलाचा दगड आहे. आमदार अनिल गोटे यांची नाराजी हा विषय भाजपा आता फार गांभीर्याने घेत नाही, हे दिसून आले. नंदुरबारात उमेदवारीवरुन सुरु असलेला संभ्रम दूर झाल्याने डॉ.हिना गावीत या प्रचाराच्या रणांगणात उतरल्या आहेत. ३० वर्षांनंतर प्रथमच काँग्रेसचा उमेदवार बदलण्याची शक्यता आहे. ७ वेळा आमदार झालेले के.सी.पाडवी यांच्याशी त्यांची लढत राहणार आहे. साक्री, शिरपूर हे धुळे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ नंदुरबारला जोडले गेले आहेत. हे दोन आणि नवापूर, धडगावदेखील काँग्रेसकडे आहेत.
विधानसभा निवडणुकीची समीकरणे या लोकसभा निवडणुकीत निश्चित होणार आहे. आपल्या मतदारसंघातून पक्षीय उमेदवाराला मताधिक्य दिल्यास विधानसभेची उमेदवारी प्रबळ होणार असल्याने अंतर्गत मतभेद, युती-आघाडीतील वाद विसरुन सगळे एकदिलाने काम करतील, असा अंदाज पक्षश्रेष्ठींना आहे.

जळगाव जिल्हा हा गेल्या २५ वर्षांपासून भाजपाचा बालेकिल्ला आहे. स्थापनेनंतर राष्टÑवादी काँग्रेसची झालेली वेगवान घोडदौड हा सत्तेच्या ऊबेचा परिणाम असल्याचे गेल्या पाच वर्षात दिसून आले. जिल्हा बँक, जिल्हा दूध संघ, जिल्हा परिषद आणि विधान परिषद निवडणुकीत राष्टÑवादीसह काँग्रेसच्या नेते, कार्यकर्त्यांनी केलेल्या तडजोडी जगजाहीर आहेत. त्यामुळे दोन्ही काँग्रेस लोकसभा निवडणुकीत भाजपाला किती आव्हान देऊ शकतात, याविषयी शंका येते. नेतृत्वाची खांदेपालट, सत्तेचा मोजक्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलेला लाभ या गोष्टी भाजपासाठी अडचणीच्या आहेत.
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेस पक्ष अद्यापही तग धरुन आहे . २०१४ च्या मोदी लाटेत लोकसभा निवडणुकीत दोन्ही जागा गमावल्या असल्या तरी विधानसभेच्या ९ पैकी ५ जागा कॉंग्रेसने जिंकल्या. धुळे, दोंडाईचा, शिंदखेडा, शहादा, तळोदा या पालिका गमावल्या तरी नंदुरबार, नवापूर, साक्री, शिरपूर या पालिका काँग्रेसकडे कायम राहिल्या. जिल्हा परिषद, जिल्हा बँक काँग्रेस आघाडीच्या ताब्यात आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपा अशा दोघांनाही याठिकाणी समान संधी आहे.

Web Title: State laboratories due to Dhule District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.