चौपदरीकरणात टाईम गेम, ‘बायपास’वर शस्त्रक्रियेला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 11:39 PM2017-10-26T23:39:04+5:302017-10-26T23:44:36+5:30
कार्यादेशाची प्रतीक्षा
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 26- फागणे-चिखली महामार्गाच्या चौपदरीकरण मुदतीआधीच पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. त्यादृष्टीने संबंधित ठेकेदार कंपन्यांनी कार्यादेश (वर्क ऑर्डर) मिळण्याआधीच ‘बायपास’वर शस्त्रक्रिया सुरू केली आहे. विशेष म्हणजे मुदतीच्या आधीच चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यास संबंधित ठेकदार कंपन्यांना कोटय़वधींचा फायदा होणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील महामार्गाचे चौपदरीकरण दोन टप्प्यात होत आहे. फागणे (धुळे) ते चिखली (मुक्ताईनगर) या महामार्गाचे चौपदरीकरण दोन टप्प्यात होत आहे. फागणे ते तरसोद आणि तरसोद ते चिखली या दोन टप्प्यातील चौपदरीकरणासाठी अनुक्रमे विश्वराज इन्फ्राटेर लिमिटेड आणि अॅग्रोइन्फ्रा प्रा. लि. या कंपन्यांशी करार झाला आहे. या कामाचे कार्यादेश अद्याप निघालेले नाहीत. मात्र त्याआधीच ठेकेदार कंपन्यांनी ‘बायपास’ जाणा:या गावांमध्ये कामाला प्रारंभ केला आहे.
‘बायपास’वर शस्त्रक्रिया
930 दिवसात चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्याची जबाबदारी दोन्ही कंपन्यांवर आहे. या दोन टप्प्यातील चौपदरीकरणात तीन ठिकाणी ‘बायपास’ची तरतूद आहे. त्यात पारोळा, पाळधी आणि वरणगावचा समावेश आहे. पाळधी आणि पारोळा बायपासवर संबंधित कंपनीने कामाला सुरुवात केली आहे. साफसफाईनंतर सपाटीकरणही शेवटच्या टप्प्यात आहे.
असा आहे ‘टाईम गेम’
930 दिवसात चौपदरीकरण पूर्ण केल्यावर संबंधित कंपन्या टोल वसुलीस पात्र राहणार आहेत. ही मुदत कार्यादेश मिळाल्याच्या दिनांकापासून लागू होते. संबंधित कंपन्यांनी कार्यादेश मिळण्याआधीच कामाला सुरुवात केली आहे. 930 दिवसांअगोदरच चौपदरीकरणाचे काम पूर्ण केल्यास टोलवसुली 930 दिवसांआधीच सुरू होईल.
कार्यादेशाला ‘बायपास’
कार्यादेश उशिरा मिळाले किंवा घेतल्यास चौदपदरीकरणासाठी जास्तीचा वेळ मिळणार आहे. माहितीनुसार, प्रत्यक्षात कामाला सुरुवात करून कार्यादेश उशिरा घेण्याची खेळी संबंधित कंपन्यांसाठी सर्वार्थाने फायदेशीर ठरणार आहे.त्यामुळे कार्यादेशाला ‘बायपास’ केले जात असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. कामाचा ठेका दोन टप्प्यात दिला जातो. आधी करार होतो मगच कार्यादेश दिले जातात. पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. दुसरा टप्पा लवकरच पूर्ण होईल. अर्थात मागच्या तारखेने कार्यादेश निघतील, असा दावा संबंधित कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे.