उद्योग क्षेत्रात काम करण्यासाठी मूल्ये व सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 07:50 AM2018-03-16T07:50:28+5:302018-03-16T07:50:28+5:30
‘गती‘तर्फे कौशल्य प्रशिक्षण सर्वेक्षण : इंग्रजी संभाषण समजण्याला ३१ टक्के युवकांनी दिले महत्त्व
जळगाव - उद्योग क्षेत्रात काम करण्यासाठी युवकांमध्ये मूल्ये व सकारात्मक दृष्टिकोन हे कौशल्य महत्त्वाचे आहे तर इंग्रजी संभाषण काळजीपूर्वक ऐकणे व समजणे महत्त्वाचे असल्याचा निष्कर्ष एका सर्वेक्षणातून पुढे आला आहे. एवढेच नाही तर व्यावसायिक शिष्टाचार, शिकण्याची तयारी, कल्पकता व टीमवर्क या कौशल्यांचा अभाव दिसून आला. उत्तर महाराष्ट्रातील उद्योगविश्वाचा गरजा पूर्ण करण्याचा दृष्टीने ‘गती’ (गोखलेज अॅडव्हॉन्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ) या संस्थेच्यावतीने दोन वेगवेगळे सर्वेक्षण करण्यात आले. उद्योग क्षेत्रात आवश्यक कौशल्य व इंग्रजी भाषेचे महत्त्व या कौशल्यांवर ३६५ युवक व उद्योजकांचे मतं जाणून घेण्यात आले.
‘गती’तर्फे पहिले सर्वेक्षण उद्योगामध्ये काम करताना युवकांमध्ये आवश्क सूक्ष्म कौशल्याबाबत करण्यात आले. यात शहरातील ११० उद्योजकांचे सर्वेक्षण करण्यात आले, यामध्ये २१ प्रकारचे उद्योगांचा समावेश होता. त्यात पॉलीमर, प्लॉस्टिक, इलेक्ट्रिकल आणि फेब्रीकेशन या उद्योगांचा सहभाग होता. उद्योग संस्थेत नव्याने होणारे पदविका व पदवीधर विद्यार्थी यांच्याकडून अपेक्षित असलेल्या विविध सूक्ष्म कौशल्यांचा अभ्यास या सर्वेक्षणात करण्यात आला. यातून महत्त्वपूर्ण मुद्दे समोर आले आहेत.
२.९५ टक्के उद्योजकांच्या मते मूल्ये आणि सकारात्मक दृष्टिकोन हे कौशल्य सगळ्यात महत्वाचे आहे. त्या खालोखाल ९४ टक्के उद्योजकांनी परिणामकारक संवाद कौशल्याला प्राधान्य दिले आहे. एकूणच सर्वेक्षणात सकारात्मक कार्य संस्कृती यावर भर देण्यात आला आहे.
हे मुद्दे नोकरीसाठी अडसर
या सर्वेक्षणात विद्यार्थी व कामगार यांच्याकडून अपेक्षित असलेल्या विविध सूक्ष्म कौशल्यांवरदेखील अभ्यास करण्यात आला. त्यांचे प्रश्न व त्यांच्याकडून अपेक्षित असलेले कौशल्य पाहता सध्यस्थितीत दिले जाणारे शिक्षण व कामागारांचा बदलता दृष्टिकोन हे मुद्दे नोकरीसाठी अडसर ठरत असल्याचे दिसून आले. तसेच व्यावसायिक शिष्टाचार, शिकण्याची तयारी, कल्पकता व टिमवर्क या कौशल्यांचा अभाव दिसून आला.
दुसरे सर्वेक्षण ‘व्यावसायिक इंग्रजी’ या विषयावर करण्यात आले. यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील व्यावसायिक महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक व उद्योग क्षेत्रातील अधिकाऱ्यांचे मते जाणून घेण्यात आली. या सर्वेक्षणासाठी संजय प्रभुदेसाई, प्रा.एस.एम.छापेकर, व्ही.एम.भट, एम.जे.चौधरी , प्रा.चारुदत्त गोखले, आर.व्ही.पाटील, प्रा.एस.ओ.दहाड यांनी मार्गदर्शन केले.
१५० प्राध्यापकांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात ६५ टक्के प्राध्यापकांनी ई-मेल व विविध व्यावसायिक अर्ज आणि पत्रांसाठी अचूक इंग्रजी लिखाण हे महत्त्वपूर्ण कौशल्य असल्याचे सांगितले. त्या खालोखाल इंग्रजी संभाष काळजीपूर्वक ऐकणे व समजणे या मुद्याला ६४ टक्के प्राध्यापकांनी संमती दिली.
विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणात २५५ च्यावर अभिप्राय घेण्यात आले. यात अभियांत्रिकी, औषधनिर्माण आणि व्यवस्थापन विद्याशाखेतील विद्यार्थी सहभागी होते. ३१ टक्के विद्यार्थ्यांनी इंग्रजी संभाषण काळजीपूर्वक ऐकणे व समजण्याला प्राधान्य दिले. २८ टक्के विद्यार्थ्यांच्या मते इंग्रजी शब्दांचे अचूक स्पेलींग व २७ टक्के विद्यार्थ्यांच्या मते संभाषण करतेवेळी योग्य काळ वापरणे महत्त्वाचे आहे.
याशिवाय उद्योग संस्थामधील ५० अधिका-यांचा अभिप्राय घेण्यात आला. ७० टक्के अधिका-यांचा मते ई-मेल व व्यावसायिक अर्ज किंवा पत्रांसाठी अचूक इंग्रजी लिखाण महत्त्वपूर्ण कौशल्य असल्याचे मत व्यक्त केले. या सर्वेक्षणाचा अहवाल विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.