भ्रष्टाचाराविरूद्ध लढा तरीही अजामिनपात्र वॉरंट काढून होतोय छळ : अंजली दमानिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 05:43 PM2018-04-16T17:43:13+5:302018-04-16T17:43:13+5:30
रावेर न्यायालाने केला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना जामीन मंजूर
आॅनलाईन लोकमत
रावेर, दि.१६ - आपण कुणी गुंड किंवा मवाली नाही. भ्रष्टाचाराविरूद्ध लढा देणारी कार्यकर्ता आहोत. कर्करोगाने त्रस्त असताना तब्बल १० तास प्रवास करीत आहोत. मात्र तरीही मुद्दाम दोन-दोन वेळा अजामिनपात्र वॉरंट काढून आपला छळ केला जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी रावेर येथ केला.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाची बदनामी केल्याप्रकरणी दाखल झालेल्या फौजदारी खटल्यात रावेर न्यायालयाने बजावलेले अटक वॉरंट रद्द करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी न्या.दिलीप मालवीय यांच्या न्यायासनासमोर हजर होवून स्वत: तब्बल अर्धा ते पाऊण तास युक्तिवाद केला. मुंबई उच्च न्यायालयाच्या हमदस्तच्या आदेशाची प्रतिलिपी पाकीटात न टाकण्याचे तांत्रिक त्रुटीमुळे हजर न राहण्याबाबत घोळ झाल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. मी कोणी गुंड, मवाली नसून वा कोणता खून वा चोरी केली नसून भ्रष्टाचाराविरूध्द लढा देणारी कार्यकर्ता आहे. ज्या खडसेंनी मंत्री पदाचा गैरवापर वापर करून संपत्ती जमवली त्यांच्याविरूद्ध खंबीरपणे लढा देत आहे. मला मुद्दाम दोनदा अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले. कर्करोगाने ग्रस्त असतांना तब्बल १० - १० तासांचा प्रवास करून का म्हणून मानसिक व शारीरिकदृष्ट्या छळण्यात येते? असा मानसिक त्रागा अंजली दमानिया यांनी व्यक्त केला. तसेच वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्याची विनंती केली. रावेर न्यायालयाने फियार्दी पक्षाचे म्हणणे ऐकून घेत अंजली दमानिया यांचा जामीन मंजूर करीत असल्याचे आदेश पारीत केले. यावेळी रावेर न्यायालयात पक्षकार वकील व शिवसैनिकांनी खच्चून गर्दी केली होती. त्यांचेसमवेत मुंबई येथून त्यांचे दीर आणि भावजयी, जळगाव येथील शिवसेनेचे गजानन मालपूरे, वकील अॅड सुधीर कुलकर्णी, रावेर शिवसेना जिल्हाउपप्रमुख प्रल्हाद महाजन, तालूका प्रमुख योगिराज पाटील, शहरप्रमुख नितीन महाजन, अशोक शिंदे, गोपाळ मिस्तरी, हर्षल बेलस्कर, अॅड.जे.जी.पाटील उपस्थित होते.