चेंडू काढताना विद्यार्थी शाळेच्या इमारतीवरुन कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 02:38 PM2018-05-18T14:38:48+5:302018-05-18T14:38:48+5:30
क्रिकेट खेळताना खुबचंद सागरमल विद्यालयाच्या इमारतीवर चेंडू घेण्यासाठी पाईपावरुन चढत असताना अचानक पाईप तुटल्याने विशाल कृष्णा दुधाने (वय १९, रा.गेंदालाल मील, शिवाजी नगर) हा विद्यार्थी जमिनीवर पडल्याची घटना दुपारी दीड वाजता घडली.
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.१८ : क्रिकेट खेळताना खुबचंद सागरमल विद्यालयाच्या इमारतीवर चेंडू घेण्यासाठी पाईपावरुन चढत असताना अचानक पाईप तुटल्याने विशाल कृष्णा दुधाने (वय १९, रा.गेंदालाल मील, शिवाजी नगर) हा विद्यार्थी जमिनीवर पडल्याची घटना बुधवारी दुपारी दीड वाजता घडली. मेंदूला मार लागल्याने हा विद्यार्थी कोमात गेला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, बुधवारी दुपारी दीड वाजता शिवाजी नगरातील खुबचंद सागरमल विद्यालयाजवळ गल्लीतील मुले क्रिकेट खेळत असताना त्यांचा चेंडू विद्यालयाच्या इमारतीवर गेला. हा चेंडू घेण्यासाठी तो पाईपावर चढत असताना त्याच्या वजनामुळे पाईप तुटला. त्यात तो पाईपासह शेजारच्या भींतीवर आदळला व नंतर जमिनीवर पडला. गंभीर जखमी झालेल्या विशाल याला मित्रांनी खासगी दवाखान्यात दाखल केले. तेथे त्याच्यावर तज्ज्ञ डॉक्टर बोलावून उपचार करण्यात आले. मेंदूला जबर मार बसल्याने मेंदू निकामी होऊन तो कोमात गेला आहे. दरम्यान, गुरुवारी दुपारी डॉक्टरांनी प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केल्याने जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. तेथे कृत्रिम श्वासोश्वासावर ठेवण्यात आले आहे. मनपातील लिपिक कृष्णा दुधाने यांचा मुलगा असून नूतन मराठा महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत आहे.