आपल्या पिल्लाला खड्ड्यातून बाहेर काढल्यानंतर हत्तींनी व्यक्त केली कृतज्ञता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 04:41 PM2017-12-11T16:41:17+5:302017-12-11T16:59:21+5:30
हत्तींच्या या कळपाची कृतज्ञता पाहून तिकडे उपस्थित लोकही भारावून गेले.
केरळ : सोशल मीडियावर आपण अनेक व्हिडिओ पाहतो. त्यातून बरंच काही शिकण्यासारखं असतं. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये हत्तीच्या कळपाने कशाप्रकारे माणसाचे आभार मानले आहेत, हे दाखवण्यात आलंय. कृतज्ञता व्यक्त करणं किती गरजेचं आहे, हेसुद्धा या व्हिडिओतून दिसून येतंय.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, केरळच्या थत्तेकांडमधील उरुलांथन्नी या नदीत एक हत्तीचं पिल्लू नदी ओलांडताना दलदलीत पडलं. हत्तींच्या या कळपाने या पिल्लाला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. त्यांनी रात्रभर मेहनत घेतली. पण ते पिल्लू काही बाहेर आलं नाही. दुसऱ्या दिवशी ही बातमी गावभर पसरली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांपर्यंत ही बातमी पोहोचली. अधिकाऱ्यांनी लागलीच मदतीसाठी धाव घेतली. दलदलीत अडकलेल्या पिल्लू बाहेर काढण्यासाठी वनविभाग कामाला लागलं होतं. तब्बल ५ हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं. गावकरी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने शेवटी दलदलीत अडकलेल्या हत्तीच्या पिल्लूला बाहेर काढण्यात यश आलं. मानवानं आपल्या पिल्लूला वाचवलं हे पाहून त्याच्या आईलाही आनंद झाला. आपल्या बाळाचे जीव वाचवल्याप्रकरणी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे या हेतूने त्या हत्तीणीने आपली सोंड उंचावून सगळ्यांचे आभार मानले.
जरा हटके बातम्यांसाठी येथे क्लिक करा.
मुक्या जीवांना बोलता येत नसलं तरीही त्यांनाही भावना असतात. म्हणूनच एवढ्या मोठ्या संकटातून आपल्या बाळाचा जीव वाचवल्याप्रकरणी या हत्तीणीनं न बोलताच माणसांप्रकती आभार भाव व्यक्त केले आहेत. हत्तीणीनं आपली सोंड उंचावून न बोलताच धन्यवाद व्यक्त केल्यानंतर तिथं जमलेल्या गावकऱ्यांनीही आनंद व्यक्त केला. हत्तीणीची भावना त्यांच्यापर्यंत पोहोचली हे सांगण्याकरता गावकऱ्यांनीही टाळ्यांचा आवाज केला. हा प्रकार घडला तेव्हा तिथं अनेकांनी व्हिडिओही काढले. त्यातलाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. फेसबुक, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून हा व्हिडिओ आता अनेकांच्या मोबाईलमध्ये आला असेल. कधी कधी माणसंही चांगल्या कामाबद्दल आभार व्यक्त करायला विसरतात. मात्र मुक्या प्राण्यांनी व्यक्त केलेली भावना पाहून त्यांनी माणसांना न बोलताच एक चांगला अध्याय शिकवला आहे.
आणखी वाचा - डुकराच्या पोटातून मिळाला असा एक दगड ज्याची किंमत आहे कोटींच्या घरात