दैवबलवत्तर म्हणून तो ट्रकखाली चिरडूनही जिवंत राहीला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2017 12:15 PM2017-11-06T12:15:14+5:302017-11-06T12:17:43+5:30
चीन : एखाद्याचा दिवस चांगला असेल तर तो व्यक्ती अगदी एखाद्या ट्रेन किंवा ट्रकखाली आला तरी जिवंत राहू शकतो. मुंबईत लोकल ट्रेनखाली येऊनही कित्येक जणांना केवळ खरचटण्यापलीकडे काहीच झालं नसल्याची अनेक उदाहरण आहेत. असाच काहीसा प्रकार घडला आहे चीनमध्ये. एक व्यक्ती बाईकने रस्ता क्रॉस करत असताना एका ट्रकखाली आला. मात्र त्याचं दैवबलवत्तर म्हणून की काय तो सुखरुप वाचला. कदाचित त्याची वेळ आली असेल मात्र काळ आला नसेल.
गेल्या आठवड्यात साऊथ चीनमधल्या गियाँग या शहरात हा थरार घडला आहे. एक अज्ञात व्यक्ती या वर्दळीच्या ठिकाणाहून जात होता. रस्ता क्रॉस करताना मागून येणाऱ्या ट्रकने त्याच्या बाईकला ठोकर दिली. त्यामुळे तो व्यक्ती थेट ट्रकच्या खाली आला. मात्र चालत्या ट्रकखाली येऊनही तो पुढच्या सेकंदात ट्रकच्या दुसऱ्या बाजूने बाहेर पडला. मात्र त्याच्या बाईकला त्या ट्रकचालकाने कितीतरी मीटर फरफटत नेलं. ट्रकखाली आलेल्या व्यक्तीला थोडीशी दुखापत झाली आहे. उपचारानंतर तो बराही होईल. मात्र वेळीच तो इसम ट्रकखालून बाहेर आला त्यामुळे त्याचा जीव वाचला. जर त्याने समयसुचकता दाखवली नसती तर मोठा अनर्थ झाला असता.
हा सगळा थरार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावरही बराच व्हायरल झालाय. मिनिटभर जरी तो इसम ट्रकखालून बाहेर आला नसता तर ट्रकखाली येऊन चिरडला गेला असता अशाच प्रतिक्रिया या सोशल मीडियातून व्यक्त होत आहेत. दरम्यान, या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या अपघतासाठी नेमकं कोण जबाबदार आहे याचीही चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असून लवकरच ट्रकचालकाचाही शोध लावण्यात येणार आहे. अपघाताशी संबंधित आरोपींना शिक्षाही करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.